डाॅ. सचिन मुरगुडेंची स्थिती चिंताजनक
संकेश्वर (महमद मोमीन) : यमकनमर्डी पोलिस ठाणा हद्दीतील नरसिंगपूर बेनकनहोळी राष्ट्रीय महामार्गावर सायंकाळी ४.३० वाजता रस्त्या शेजारी थांबलेल्या कंटेनर ट्रकला पाठीमागून इनोव्हा कारने जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात संकेश्वर डॉ. मुरगुडे कुटुंबातील माय-लेक जागीच ठार झाल्या आहेत. अपघातात संकेश्वरचे नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सचिन मुरगुडे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांची स्थिती चिंताजनक आहे.
अपघाताची माहिती अशी, संकेश्वरचे नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सचिन मुरगुडे रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे ते इनोव्हा कार क्रमांक केए-२३/ एन-४२६१ घेऊन धारवाड नजिकच्या आगडीतोट येथील पुरातन कालीन वस्तू संग्रहालयाला गेले होते. तेथून ते संकेश्वरकडे परतत असताना पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील नरसिंगपूर बेनकनहोळी येथे रस्त्याशेजारी थांबलेल्या कंटेनर ट्रक क्रमांक केए २३/ बी-५८ ला पाठीमागून जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात डॉ. सचिन मुरगुडे यांची धर्मपत्नी डॉ. श्वेता मुरगुडे (वय ३८), कन्या शिया सचिन मुरगुडे (वय ७) जागीच ठार झाले आहेत. अपघातात नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सचिन शिवानंद मुरगुडे (वय ४२) गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ बेळगांव के.एल.ई इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. डाॅ.सचिन यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे त्यांची स्थिती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
कोविड दुसऱ्या लाटेत वडील दगावले
संकेश्वरचे प्रसिद्ध डॉ. शिवानंद मुरगुडे कोविडच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाने मरण पावले होते. त्यामुळे डॉ. सचिन मुरगुडे यांना कोरोना महामारीत वडीलांना गमवावे लागले होते. आजच्या अपघातात डॉ. सचिन यांना पत्नी डॉ. श्वेता कन्या शिया यांना गमवावे लागले आहे. वडीलांच्या निधनाच्या दुःखातून डॉ. सचिन निटसे सावरलेले नसताना अपघाताने त्यांना जबरदस्त धक्का बसला आहे.
इनोव्हा कार ट्रकमध्ये घुसले
इनोव्हा कार भरवेगात येवून कंटेनर ट्रकच्या मागे घुसल्याने इनोव्हाचा समोरील भाग चक्काचूर झाला आहे. इनोव्हा कारचे ड्रायव्हिंग खुद्द डॉ. सचिन मुरगुडे करीत होते. कारवरील त्यांचा ताबा सुटल्याने काय थेट पाठीमागून कंटेनरमध्ये घुसल्याचे सांगितले जात आहे. यमकनमर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश छायागोळ, पोलीस उपनिरीक्षक न्यामनगौडा यांनी घटनास्थळी भेट देवून गंभीरजखमी डॉ. सचिन मुरगुडे यांना उपचारार्थ इस्पितळाकडे पाठवून देण्याचे कार्य केले. यमकनमर्डी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.