
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर बाजारात कागदी लिंबूला लोकांत मोठी मागणी दिसताहे. उन्हाचा चढता पारा लिंबू दरात वाढ करणारा ठरला आहे. बाजारात लिंबूची आवक घटली असून दरवाढ झालेली दिसत आहे. संकेश्वरात यंदा लिंबू दरांने उच्चांक गाठला असून कागदी लिंबूचा दर शेकडा ५०० ते १२०० रुपये झाला आहे. किरकोळ लिंबू विक्री दहा-बारा रुपयाला एक लिंबू चाललेली दिसत आहे. वाढत्या उन्हामुळे, आणि यात्रा महोत्सव लग्नसराईच्या हंगामाने बाजारात लिंबूला मोठी मागणी दिसत आहे. दरवाढ झाल्याने लिंबूचा वापर लोक विशेष करुन महिला बेताने करतांना दिसताहेत. संकेश्वरकरांना वाढत्या उष्मापासून बचावसाठी लिंबू सरबत महागडे ठरलेले दिसत आहे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना येथील लिंबू व्यापारी मुस्ताक मुल्ला म्हणाले, संकेश्वर बाजारात लोकांत लिंबूला मोठी मागणी राहिली आहे. दरवाढ झाल्यामुळे लोक पैसे मोजताना जिकीरी करु लागले आहेत. संकेश्वर बाजारात विजयपूर येथून कागदी लिंबूची आवक सुरु आहे. लिंबू रसाळ असले तरी लोकांच्या खिशाला ते परवडेनासे झाले आहेत. संकेश्वरात यंदा लिंबू दराने नवा विक्रम नोंदविला आहे. येत्या हे महिन्याच्या अखेरपर्यंत लिंबू दरात वाढच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta