
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिकेचे वादग्रस्त मुख्याधिकारी जगदीश ईटी यांची लवकरच अन्यत्र बदली होणार असल्याची चर्चा नगरसेवकांतून केली जात आहे. गेल्या सहा वर्षांपासून ईटी संकेश्वर पालिकेत मुख्याधिकारी म्हणून सेवा बजावित आहेत. पालिकेत मुख्याधिकारीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर वर्षभर त्यांची कामगिरी चांगली ठरली. तदनंतर त्यांचा मनमानी कारभार सुरू झाला तो अद्याप चालूच आहे. त्यांच्या कामकाजाविषयी नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी उपनगराध्यक्ष अजित करजगी, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक-नगरसेविकांत असमाधान दिसत आहे. त्यामुळे ईटी यांच्या बदलीची मागणी केली जात आहे. गावातील सर्वच २३ प्रभागात विकास कामांच्या आणि स्वच्छतेच्या नावाने लोक शिमगा करताहेत. त्यामुळे सर्वच पालिका सदस्य मुख्याधिकारी जगदीश ईटी यांच्या नावाने ओरड करताहेत. हुक्केरीचे आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती, माजी खासदार रमेश कत्ती यांच्याकडे ईटी यांच्या मनमानी कारभाराची तक्रार सदस्यांनी, नागरिकांनी सातत्याने चालविली आहे. त्यामुळे मंत्रीमहोदयंनी ईटी यांची कानउघडणी करुन बदलीवर जाण्यास सांगितल्याची चर्चा होताना दिसत आहे. परवाच्या एका कार्यक्रमात नगरसेवक संजय शिरकोळी यांनी ईटी यांचा हा शेवटचा कार्यक्रम असल्याचे सांगून त्यांची बदली होत असल्याचे स्पष्ट केले आहे. आमच्या प्रतिनिधीनी याविषयी मुख्याधिकारी जगदीश ईटी यांना छेडले असता त्यांनी आपण लवकरच संकेश्वर पालिकेला रामराम करीत असल्याचे सांगितले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta