
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात तब्बल दिडशे वर्षानंतर प्रथमच विशिष्ट पद्धतीने चिरंजीव नागमल्लीकार्जुन यांचा अय्याचार आणि महेश्वर मंत्रोपदेश कार्यक्रम येत्या रविवार दि. १ मे २०२२ रोजी संकेश्वर श्री महालक्ष्मी समुदाय भवन येथे होत असल्याची माहिती संजय शशीधर हिरेमठ (स्वामी) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ते पुढे म्हणाले, चि.नागमल्लीकार्जन यांचा अय्याचार आणि महेश्वर मंत्रोपदेश कार्यक्रम श्रीशैलचे जगद्गुरु डॉ. चन्नसिध्दराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी, निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी, संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजी, हत्तरगी मठाचे श्री गुरुसिध्देश्वर महास्वामीजी, नूल सुरगेश्वर संस्थान मठाचे श्री गुरुसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात होत आहे. हिरेमठ परिवाराला ११६५ वर्षांची धार्मिक विधीविधान करण्याची परंपरा लाभली आहे. आपले सुपुत्र चि.नागमल्लीकार्जन हे अय्याचार झालेनंतर हिरेमठ परिवाराचे धार्मिक विधीविधान कार्यक्रम पुढे चालविणारे पुरोहित (स्वामी) समजले जाणार आहेत. आमच्या परिवाराची १९ वी पिढी वीरशैव लिंगायत धर्म विधीविधानाचा वारसा पुढे चालविण्याचे कार्य करणार आहे. आपण आयोजित केलेला अय्याचार आणि महेश्वर मंत्रोपदेश कार्यक्रम संकेश्वरात तब्बल दिडशे वर्षानंतर प्रथमच होत आहे. महेश्वर मंत्रोच्चारात मोठी ताकद आहे. लिंगैक्य शशिधर मलकय्या हिरेमठ यांच्या धार्मिक विधीविधान कार्याचा वारसा आपण गेली ४० वर्षे झाली पार पाडीत आहोत. आपल्याकडे वेंगुर्ला, सातारा, गडहिंग्लज, कागल तालुक्यातील तसेच कर्नाटकातील सागर आणि बेळगांव जिल्ह्यातील बहुसंख्य लोक धार्मिक विधीविधान कार्यक्रमासाठी येतात. आजच्या कलयुगात लोकांची देवावरील श्रध्दा कोठेतरी कमी होतांना दिसत आहे. त्यामुळे लोकांत असमाधान, नैराश्य प्रकर्षाने दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मल्लिकार्जुन ऊर्फ रावसाहेब देसाई, नागमल्लीकार्जुन, विरुपाक्ष मलकट्टी, मल्लिकार्जुन शिरहट्टी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक अप्पासाहेब गस्ती यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta