संकेश्वर (महंमद मोमीन) : पोलिसांना युवकांची साथ हवी असल्याचे संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी यांनी सांगितले. ते आज संकेश्वर पोलिस ठाण्यावर आयोजित यंगस्टार सभेला उद्देशून बोलत होते. ते पुढे म्हणाले बेळगांव जिल्हा पोलिस प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली आणि संकेश्वर पोलिस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी यांच्या नेतृत्वाखाली संकेश्वर पोलिसांनी यंगस्टार व्हाट्सअप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपचे युवकमित्र आपल्या भागात घडणाऱ्या घटनांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करणार आहेत. यंगस्टार ग्रुपचे युवक पोलिसांची भूमिका निभावणार आहेत. यामुळे संकेश्वर भागात घडणाऱ्या दुर्घटना असो क्राईम यांची माहिती पोलिसांना सत्वर मिळणार आहे. पोलिस-युवक एकत्र येऊन समाज सुधारणेचे कार्य उत्तम प्रकारे करण्यासाठी यंगस्टारची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना संकेश्वर पोलिस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी म्हणाले, युवकांनी व्यसनमुक्त समाजसाठी कार्य करण्याची आवश्यकता आहे. व्यसनामुळे युवा वर्ग भरकटत चालला आहे.त्याला रोखण्याचे कार्य यंगस्टार सदस्यांनी करायला हवे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी युवा नगरसेवक सचिन भोपळे, संतोष सत्यनाईक, अल्ताफ शाहेण्णावर, प्रितम सुमारे, सुजल नष्टी, अमोल गोंधळी, दादासाहेब बेविनकट्टी यंगस्टार ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.