पाच महिन्यानंतर कारवाई
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर हिरण्यकेशी नदीवरील जुना गोटूर बंधार हटविणेची मागणी भारतीय किसान संघाने गेल्या पाच महिन्यांपासून चालविली होती. त्याची दखल घेत हुक्केरी मतक्षेत्राचे आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी गोटूर बंधार हटविणेसाठी विशेष निधी मंजूर करुन देण्याबरोबर गोटूर बंधार हटाविणेचे कार्य सुरू करण्याचा आदेश कर्नाटक अधिक्षक अभियंता यांना धाडल्याने आज मंगळवार दि. ३१ मे २०२२ पासून जुना गोटूर बंधार हटविणेचे कार्य सुरू झाले आहे. याबद्दल भारतीय किसान संघ गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूरचे बसवराज हंजी, राम पाटील, बाळगौडा पाटील, अमरनाथ घुगरी, अजित नडगदल्ली, राजू मोळदी, तमण्णा हत्ती, यांनी नामदार उमेश कत्ती, एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर, सुपरिटेंड इंजिनिअर यांचे आभार मानले आहेत. जुना गोटूर बंधारा हटविणेचे कार्य नांगनूरचे उपसरपंच विकास मोकाशी, सोमगोंडा आरबोळे, यांच्या उपस्थितीत सुपरिटेंड इंजिनिअर सतीश यांनी दुपारी १.४५ वाजता सुरू केले. जुना गोटूर बंधारा हटविणेसाठी भारतीय किसान संघाने सातत्याने मागणीचा पाठपुरावा सुरू ठेवला होता. सुमारे साडेचार महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर आज प्रत्यक्षात कामकाजाला सुरुवात झाली आहे. येत्या दहा दिवसांत बंधारा निघाल्यास येत्या पावसाळ्यात हिरण्यकेशीला महापुराचे संकट टळणार आहे. संकेश्वर हिरण्यकेशी नदीला महापूर येण्यास जुना गोटूर बंधारा कारणीभूत ठरला आहे. तसेच नदी पात्रातील अनेक अढथळे देखील कारणीभूत ठरले आहेत. संकेश्वर हिरण्यकेशी नदीवरील जुना गोटूर बंधारा जिर्ण होऊन ढासळू लागल्यामुळे नविन गोटूर ब्रिज कम बंधार उभारण्यात आले आहे.त्यामुळे जुना गोटूर बंधारा हटविणे क्रमप्राप्त ठरले होते. बंधारा हटावसाठी भारतीय किसान संघाचे राम पाटील यांनी सातत्याने मागणीचा पाठपुरावा ठेवून अखेर कर्नाटक प्रशासनाला जुना गोटूर बंधार हटविणेसाठी भाग पाडले आहे. त्यामुळे भारतीय किसान संघाचे राम पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष अभिनंदन संकेश्वर, नांगनूर, खनदाळ, अरळगुंडी, भागातील नागरिकांतून, शेतकऱ्यांतून केले जात आहे.
