संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर-गडहिंग्लज रस्ता येथील बायपास ब्रिजजवळ महाराष्ट्र शासनाच्या गावांचा दिशादर्शक फलक झळकाविणेत आला होता. तो येथील कन्नड पर संघटनांच्या दृष्टीश पडताच आज सकाळी कन्नडपर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी मोर्चाने जाऊन फलक हटविण्याची जोरदार मागणी करत घोषणाबाजी केली.
संकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी, पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी यांनी जेसीबीच्या सहाय्याने फलक हटविणेचे कार्य केले. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने कर्नाटकच्या हद्दीत महाराष्ट्र शासन असा उल्लेख असलेला नामफलक उभा केल्यामुळे कन्नडपर संघटनेच्या कार्यकर्त्यांची तळपायाची आग मस्तकाला भिडकलेली दिसली. संतप्त कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजीने पोलिसांना फलक हटविणेस भाग पाडले. यावेळी कन्नडपर संघटनेचे संतोष पाटील, प्रितम सुमारे, लक्ष्मण बाने, संतोष सत्यनाईक, पिंटू सुर्यवंशी, मोहसिन पठाण कार्यकर्ते उपस्थित होते.