संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पुणे -बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हिरण्यकेशी ब्रिज जवळ कारने मोटारसायकलला पाठीमागून जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वार बाहुबली अप्पासाहेब देवण्णावर (वय ३६) राहणार निलजी तालुका गडहिंग्लज जागीच ठार झाला आहे. अपघाताची पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी बाहुबली अप्पासाहेब देवण्णावर हा निलजी येथून मोटारसयकल क्रमांक एम.एच.09/ पीएफडी-3309 घेऊन गोटूर येथील पी.एम कारेकाजी पेट्रोल पंपात कामाला जात असताना वाटेत हिरण्यकेशी ब्रिजजवळ निपाणी येथून बेळगांवकडे भरवेगात निघालेली कार क्रमांक एम.एच 43/ बीके-5878 ने पाठीमागून जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात बाहुबली देवण्णावर जागीच ठार झाला आहे. कारचालक राजेश यांच्या निष्काळजीपणाने भरवेगात वाहन चालविल्याने अपघात घडला आहे. बाहुबली हा गेल्या पाच वर्षांपासून कारेकाजी यांच्या पेट्रोल पंपात डीसीएम म्हणून सेवा बजावित होता. गुरुवार दि. 16 जून 2022 रोजी सकाळी 6.30 वाजता तो कामावर दुचाकीवरून जात असताना कारने पाठीमागून जोराची धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. अप्पासाहेब देवण्णावर यांचा बाहुबली एकुलता मुलगा असून त्याच्या मागे आई-वडील, पत्नी दोन मुले असा परिवार आहे. संकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताचा पंचनामा करुन कार चालक राजेश तेले राहणार शालीग्राम जिल्हा ठाणे याला ताब्यात घेतले आहे. संकेश्वर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
