Sunday , May 31 2026
Breaking News

संपत्तीच्या हव्यासापोटी मुलाचा कळस; वृद्धापवेतन, दागिने बळकावून 78 वर्षीय आईला घराबाहेर काढले

Spread the love

 

रायबाग : आईने आयुष्यभर कष्ट करून वाढवलेल्या मुलानेच वृद्धापकाळात तिचा आधार बनण्याऐवजी छळ करत घराबाहेर काढल्याची हृदयद्रावक घटना रायबाग तालुक्यातील माडलगी येथे घडली आहे. वृद्धापवेतन, गृहलक्ष्मी योजनेचे पैसे आणि दागिने बळकावून 78 वर्षीय आईला बेघर केल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हालप्पा खांडेकर असे संबंधित मुलाचे नाव असून त्याने आपल्या आई सत्यव्वा खांडेकर यांचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संपत्तीच्या हव्यासापोटी हालप्पा हा आईकडे तिच्या माहेरच्या मालमत्तेतील हिस्सा आणण्यासाठी सातत्याने दबाव टाकत होता. मात्र सत्यव्वा यांनी त्यास नकार दिल्यानंतर त्याने त्यांना मारहाण करून घराबाहेर काढल्याचे समोर आले आहे.

मुलाच्या त्रासाला कंटाळून सत्यव्वा यांनी सध्या चिक्कोडी तालुक्यातील बेळकूड येथील आपल्या माहेरी आश्रय घेतला आहे. वृद्धापकाळात मुलाकडून आधार मिळण्याऐवजी अपमान, छळ आणि उपेक्षा सहन करावी लागत असल्याने त्या मानसिकदृष्ट्या खचल्या असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

विशेष म्हणजे, सत्यव्वा यांना मिळणारे वृद्धापकाळ पेन्शन तसेच गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदतही हालप्पा स्वतःकडेच ठेवत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधनही हिरावून घेतल्याचे बोलले जात आहे.

या अमानवी प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, वृद्ध आईला तातडीने न्याय मिळावा तसेच संबंधित मुलावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

वृद्ध आई-वडिलांच्या सांभाळाची जबाबदारी टाळून त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या अशा घटनांमुळे समाजमन हेलावून जात असून, ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी अधिक प्रभावी उपाययोजनांची गरज अधोरेखित होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक यश हेच उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम पाऊल : डॉ. शोभलता उदपीडी

Spread the love  बेळगाव : एसएसएलसी आणि पीयूसी परीक्षांमधील यश हे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *