Sunday , July 26 2026
Breaking News

सीमाप्रश्नाच्या सुनावणीसाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घ्यावा; उदय सामंतांकडे समितीची मागणी

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी रविवारी बेळगाव दौऱ्यात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. यावेळी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या बेळगाव सीमाप्रश्नाच्या खटल्याची लवकर सुनावणी व्हावी आणि त्यासाठी महाराष्ट्र सरकारने सक्रिय भूमिका घ्यावी, अशी मागणी समितीच्या शिष्टमंडळाने केली.

यावेळी बोलताना सामंत म्हणाले की, महाराष्ट्रात 25 जून पर्यंत विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याने तत्काळ बैठक घेणे शक्य नाही. मात्र आचारसंहिता संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आयोजित करण्यासाठी आपण समन्वयक म्हणून पुढाकार घेणार आहोत.

मध्यवर्ती म. ए. समितीने 29 जून रोजी मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र उदय सामंत यांनी आश्वासन दिले आहे की तशी वेळ येऊ देणार नाही.

सीमाप्रश्नाबाबत बोलताना सामंत यांनी सांगितले की, कर्नाटक सरकारवर टीका करण्यासाठी आपण बेळगावात आलेलो नाही. सीमाभागातील मराठी भाषिकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या संबंधित यंत्रणांसमोर मांडण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. मराठी भाषा मंत्री म्हणून आपण कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांची भेट घेऊन मराठी भाषिकांच्या समस्या मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच सीमाभागातील मराठी भाषिकांवर कन्नड भाषेची सक्ती होऊ नये, अशी विनंतीही आपण कर्नाटक सरकारकडे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, एका कार्यक्रमाच्या पत्रिकेत बेळगावचा उल्लेख “बेळगावी” असा झाल्याबद्दल सामंत यांनी दिलगिरी व्यक्त केली. सीमाभागातील प्रश्नांबाबत संपर्कासाठी आपण कायम उपलब्ध राहू तसेच लवकरच संबंधित मंत्र्यांसह पुन्हा सीमाभागाचा दौरा करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

मराठी भाषिकांना न्याय मिळावा आणि त्यांच्या समस्या मार्गी लागाव्यात, हीच महाराष्ट्र सरकारची भूमिका असल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *