बेळगाव : अग्निपथ योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या सातव्या अग्निवीर तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा शनिवारी मोठ्या उत्साहात आणि लष्करी शिस्तीच्या वातावरणात पार पडला. २४ आठवड्यांचे कठोर सैनिकी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या ७६५ अग्निवीरांनी यावेळी देशसेवेसाठी स्वतःला समर्पित करण्याची शपथ घेतली.
बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे आयोजित या भव्य संचलनाचे नेतृत्व अग्निवीर संकेत सिंग यांनी केले. परेडच्या प्रशासकीय अधिकाऱ्याची जबाबदारी मेजर गजानन पाटील यांनी सांभाळली. कार्यक्रमात एमएलआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडियर गिरीष उपाध्ये यांनी मानवंदना स्वीकारून संचलनाची पाहणी केली.
या सोहळ्यास वरिष्ठ लष्करी अधिकारी, अग्निवीरांचे पालक, माजी सैनिक, एनसीसी कॅडेट्स तसेच विविध शाळांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लष्करी शिस्त, पराक्रम आणि राष्ट्रसेवेच्या भावनेचे दर्शन घडविणाऱ्या या संचलनाने उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी मार्गदर्शन करताना ब्रिगेडियर गिरीश उपाध्ये यांनी मराठा लाईट इन्फंट्री ही भारतीय सैन्यातील सर्वात जुन्या आणि गौरवशाली पायदळ रेजिमेंटपैकी एक असल्याचे सांगितले. येथे दिले जाणारे प्रशिक्षण सैनिकांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण, शारीरिक क्षमता आणि राष्ट्रसेवेची भावना विकसित करण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रशिक्षणादरम्यान आत्मसात केलेली मूल्ये आणि शिस्त सेवाकाळातही कायम राखण्याचे आवाहन त्यांनी नवोदित अग्निवीरांना केले.
कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अग्निवीरांचा गौरव करण्यात आला. उत्कृष्ट अग्निवीर नेता म्हणून यशवंत घाडगे यांना सन्मानित करण्यात आले, तर व्हिक्टोरिया क्रॉस पदक घोलप आदर्श यांना प्रदान करण्यात आले.
दीक्षांत संचलनानंतर ब्रिगेडियर गिरीश उपाध्ये यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहिली. उपस्थितांनीही शहीद सैनिकांच्या स्मृतींना अभिवादन करत राष्ट्रसेवेचा संकल्प व्यक्त केला.
७६५ नव्या अग्निवीरांच्या भारतीय सैन्यातील प्रवेशामुळे देशाच्या संरक्षण क्षमतेत आणखी बळकटी येणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
Belgaum Varta Belgaum Varta