
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात पावसा अभावी खरीप पेरण्या लांबणीवर पडल्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आकाशाकडे डोळा लावून बसला होता. आज पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी (बळीराजा) खूश झालेला दिसत आहे. संकेश्वर परिसरात तीन तास बरसलेल्या दमदार पावसाने शेतशिवारात पाणीच-पाणी झालेले दृश्य पहावयास मिळत आहे. मृग जाता-जाता बरसणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. तो खरा ठरला आहे. मृग नक्षत्र काळात बरसणाऱ्या पावसातच खरीप पेरण्या होणे आवश्यक असल्याने शेतकरी मृगाची चातकासारखी वाट पहात बसला होता. आज दुपारी ३ वाजता सुरु झालेला पाऊस सायंकाळी ६ वाजेपर्यंत दमदार कोसळला. खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांनी जय्यत तयारी केली असून येत्या दोन दिवसांत पेरणीची धांदल उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कमतनुरला पावसाने झोडपले
कमतनूरला पावसाने झोडपून काढले. तीन तास झालेल्या दमदार पावसाने शेतशिवारात पाणी मावेनासे झाले आहे. पावसाचे पाणी शेतीचे बांध तोडून शेतातून बाहेर पडतानाचे चित्र पहावयास मिळाले. कमतनूर परिसरातील शेतशिवारात पावसाचे पाणीच पाणी साचून राहिलेले दिसत आहे. कमतनूर येथील हाॅटेल मुस्कान तसेच अन्य हाॅटेल आणि दुकान गाळ्यात पावसाच्या पाण्याने शिरकाव केलेला दिसत आहे. हाॅटेलात पावसाच्या पाण्याने शिरकाव केल्यामुळे हाॅटेल चालकांना पावसाचे पाणी बाहेर काढेस्तोपर्यंत नाके नव झालेले दिसले.
Belgaum Varta Belgaum Varta