संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर परिसरात देशाचा 73 वा प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. सरकारी निमसरकारी कार्यालय, शाळा-महाविद्यालय सहकारी संघ-संस्थांनी महात्मा गांधीजी, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा पूजनाने, प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण केले.
संकेश्वर पालिका, टपाल कचेरी, शासकीय रुग्णालय, पोलिस स्टेशन अशा सर्वच कार्यालयावर तिरंगा डौलाने फडकतांना दिसला. गावात ठिक-ठिकाणी जिलेबीचे आकर्षक स्टॉल थाटण्यात आलेले दिसले. गांधी चौक येथील ध्वजारोहण नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी यांनी केले.
यावेळी उपनगराध्यक्ष अजित करजगी, पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी, मुख्याधिकारी जगदीश ईटी अनेक मान्यवर शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संकेश्वर अर्बन क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेचे ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष अमर नलवडे, वीरराणी सौहार्दचे ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष मलगौडा उर्फ बसनगौडा पाटील यांनी केले. संकेश्वर पोलीस ठाण्यावर पोलीस कर्मचार्यांनी तर संकेश्वर महाविद्यालयात एनसीसी कॅडेटनी शानदार पथसंचलन सादर केले.
सरकारी आदेशाच उल्लंघन
सरकारने शासकीय प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात महात्मा गांधीजी, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्याचा आदेश धाडलेला असला तरी आदेश धाब्यावर बसवून बर्याच ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आल्याचे दिसून आले आहे. गांधी चौक येथील प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा नसल्याबद्दल चिकोडी जिल्हा काँग्रेस कामगार विभागाचे अध्यक्ष महेश हट्टीहोळी यांनी कार्यक्रमाला उपस्थित शासकीय अधिकारी, संकेश्वर पालिकेचे मुख्याधिकारी जगदीश ईटी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी बेळगांव जिल्हाधिकारी, सहाय्यक जिल्हाधिकारी, हुक्केरी तहसीलदार डॉ. डी. एच. हुगार यांच्याकडे केली आहे. शासकीय प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात कांहीं ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर कांही ठिकाणी क्रांतीवीर संगोळी रायण्णा प्रतिमेचे पूजन करण्यात आलेले पहावयास मिळाले.
