संकेश्वर (महंमद मोमीन) : हुक्केरी पोलिसांनी दोघा आंतरराज्य भामट्यांकडून २२ लाख रुपये किंमतीचे ४२१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे अलंकार जप्त केले आहे. याविषयीची पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, हुक्केरी कोर्ट सर्कल येथे चोर भामट्यांनी एका महिलेला भूलथापा घालून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेऊन पोबार केल्याची घटना हुक्केरी पोलिसांत नोंद करण्यात आली होती. त्याचप्रमाणे कर्नाटक, महाराष्ट्र, वेंगुर्ला येथील ज्वेलरी शाॅप मालकांची चोरांकडून फसवणूक झाल्याची प्रकरणे उघडकीस आल्याने सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत बेळगांव जिल्हा पोलिस प्रमुख संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गोकाक डीएसपी मनोजकुमार नाईक, हुक्केरी पोलीस निरीक्षक महंमदरफीक तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली हुक्केरी पोलिसांनी सापळा रचून दोघा आंतरराज्य अट्टल चोरट्यांना गजाआड केले आहे. चोरांनी हुक्केरी, गोकाक, रायबाग, बेळगांव शहर, कोल्हापूर, सोलापूर, वेंगुर्ला, सोलापूर, इचलकरंजी येथील ज्वेलरी शाॅप मालकांना भूलथापा घालून सोन्याचे अलंकार घेऊन पोबारा केल्याचे उघडकीस आले आहे. अट्टल चोरभामटे ज्वेलरी शाॅपमध्ये ग्राहक बनून केली प्रवेश करायचे. दुकान मालकांना ओळखपत्र, आधारकार्ड, मोबाईल क्रमांक देऊन सोन्याचे अलंकार खरेदी केले नंतर फोन-पे, गुगल-पे करतो असे सांगून फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. दोघा आंतरराज्य अट्टल चोर भामट्यांना सापळा रचून गजाआड करण्याचे काम हुक्केरी पोलीस निरीक्षक महंमदरफीक तहसीलदार, पोलीस उपनिरीक्षक श्रीमती एल. एल. पत्तेण्णावर, गुन्हा विभागाचे पोलिस उपनिरीक्षक ए. एस. सनदी, अपराध विभागाचे पोलिस कर्मचारी सी. पी. पाटील, मंजुनाथ कब्बूर, जी. एस. कांबळे, एस.आर. रामदुर्ग, ए.एल. नाईक, यु.वाय. आरभांवी, आर.एस. ढंग, बी.व्ही नावी, एम. के. अत्तार, बेळगांव तांत्रिक विभागाचे पोलिस कर्मचारी सचिन पाटील, विनोद ठक्कण्णावर, यांनी विशेष परिश्रम घेतले आहे. पोलिसांनी चोरट्यांकडून २२ लाख ७३ हजार ४०० रुपये किंमतीचे ४२१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे अलंकार, चोरीसाठी वापरण्यात आलेली ३५ हजार रुपयांची मोटारसायकल जप्त केली आहे. हुक्केरी पोलिसांत चोरीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे. न्यायालयाने एका आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली असून दुसऱ्या आरोपीला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.