

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील डाकघर (पोस्ट ऑफीस)ने दिडशे वर्षे उत्तम सेवा बजावून जनमानसातील आपली विश्वासार्हता कायम केल्याचे युवानेते पवन कत्ती यांनी सांगितले. गोकाक विभागिय कार्यालयाच्या संकेश्वर पोस्ट ऑफीसतर्फे आयोजित “संकेश्वर मुखिया डाकघरच्या विशेष लखोटा प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संकेश्वर नेसरी गार्डन डिलक्स येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी स्वामी विवेकानंद शाळेच्या विद्यार्थिनींनी प्रार्थना गीत सादर केले. धारवाडचे पोस्ट मास्टर ॲण्ड जनरल डाॅ.एन. विनोदकुमार प्रमुख पाहुणे युवानेते पवन कत्ती, डॉ. स्मृती हावळ, जी.सी.कोटगी, एच. बी हासबी (एसपी) यांच्या हस्ते वृक्षरोपाला जलार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
पवन कत्तीं पुढे म्हणाले, पोस्टाने लोकांच्या भावना एकमेकांपर्यंत पोचविण्याचे कार्य केले आहे. पोस्टकार्डात लोकांच्या भावना शब्दरुपात मांडल्या जातात. एककाळ असा होता आपल्या गावात पोस्ट ऑफीस सुरु होते ही अभिमानाची गोष्ट समजली जायची. लोक पोस्टमनची वाट पहात बसायचे. पोस्टमन कधी आनंदाची तर कधी दुःखद घटनेचे संदेश घेऊन यायचे. आज देखील ग्रामीण भागातील लोक पेन्शनसाठी पोस्टमनच्या येण्याची वाट पहात बसलेले दिसतात. पोस्टाने लोकांचं प्रेम आणि विश्वास संपादन केले आहे. त्यामुळे संकेश्वर पोस्ट ऑफीसची दिडशे वर्षांची यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे सांगून ते म्हणाले पोस्टल खात्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपली सेवा आणखी जलद करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. एन. विनोदकुमार, युवानेते पवन कत्ती यांच्या हस्ते पोस्ट कार्यालयात चांगली सेवा बजाविणाऱ्यां कर्मचारींचा डाक कर्मयोगी पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना डाॅ.एन. विनोदकुमार म्हणाले, देशात आयकॉनच्या यादीत पोस्टाचा प्रथम क्रमांक लागतो. नेटवर्कमध्ये देखील पोस्टाने बॅंकांना मागे सारले आहे. पोस्टाने लोकांचा विश्वास कायम ठेवल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. स्मृती हावळ, जी. सी कोटगी, एच. बी हासबी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गजानन क्वळी, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक ॲड प्रमोद होसमनी, गंगाराम भूसगोळ, नंदू मुडशी, रोहण नेसरी, विवेक क्वळी, सागर जकाते, संदिप दवडते, मुख्याधिकारी आर सी चौगुला, पोस्टल विभागाचे अधिकारी एम. आर. कामगौडर, नागराज मल्ली, शिवमूर्ती एच, सोमशेखर सारापूरे, दयानंद कंचगारट्टी, अनेक मान्यवर गोकाक विभागीय पोस्ट कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta