
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर कार्पोरेशन बॅंकेजवळच्या ऐरणीच्या देवाला जुन्या हिन्दी चित्रपटातील सदाबहार गाण्यांची मोठी आवड दिसताहे. येथील छोट्याशा पत्र्याच्या शेडमध्ये कृष्णा लोहार विषयावर घाव घालून शेतकऱ्यांना लागणारी औजारे तयार करून देण्याचे कार्य करत आहेत. गेली तीस वर्षे सरली त्यांची किसान सेवा सुरू आहे. ते दगडी कोळशाने भाता पेटवून लोखंडी पात्याला विळ्याचा आकार देतात. काबाडकष्टाच्या कामात त्यांना जुन्या हिन्दी चित्रपटातील सदाबहार गाण्यांची साथ लाभलेली दिसत आहे. त्यांच्या शेडमधील लोखंडाला वितळविणारा जुना भाता पाहून भालजी पेंढारकर यांच्या साधी माणसं चित्रपटातील
“ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आभाळागत माया तुझी आम्हावर राहू दे! या गाण्याची आठवण होते.
आमच्या प्रतिनिधीशी बोलताना कृष्णा लोहार म्हणाला, गेली तीन वर्षे सरली आपली किसान सेवा सुरू आहे. आमचं गाव पडलीहाळ तालुका चिकोडी आहे. कामाच्या शोधात संकेश्वरला आलो आणि येथेच स्थायिक झालो आहे. भात्याचं काम कष्टदायक असलं तरी आता सवय जडली आहे. आपण शेतकऱ्यांना लागणारी औजारे बनवून देण्याचे कार्य करतो. याचा सार्थ अभिमान वाटतो. कारण देशाला पोसणाऱ्या शेतकऱ्यांच्या कामी येण्याचं भाग्य आपल्याला लाभलं आहे. आपण शेतकऱ्यांना नवा विळा (खुरपी) १०० ते १५० रुपयाला देतो. खराब झालेली औजारे दुरुस्त करून देण्याचे काम देखील करतो. त्याला ग्रामीण भाषेत विळ्याला पाणी पाजणे असे म्हणतात. याकरिता ५० ते ६० रुपये मोबदला मिळतो. हिन्दी चित्रपटातील जुनी सदाबहार गाणी आपलं कष्टदायक काम सुलभ करुन देण्याचं कार्य करताहेत. जुन्या गाण्यांची हीच तर खासियत आहे. आपल्या कष्टदायक कामाला जुन्या गाण्यांची साथ लाभली आहे. कोणतंही काम छोटं मोठं नसतं.कामावरील निष्ठा महत्वाची असते. किसान सेवेला आपण आपलं जीवन सर्मपित केलं आहे. आपल्या सारखे अनेक कारागिर आहेत. मायबाप सरकारने त्यांच्या कष्टदायक कामाची दखल घेऊन त्यांना मानधन देण्याचं कार्य करायला हवे असल्याचे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta