

अपहरणकर्त्यांकडून तीन बाईक, सहा मोबाईल हस्तगत
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर-गोकाक अपराध विभागाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी संकेश्वरातील कु. साई अपहरण प्रकरणाचा केवळ दोन तासांत छडा लावण्याची अभिमानास्पद कामगिरी करुन दाखविल्याचे बेळगाव जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. संजीव एम. पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ते संकेश्वर पोलिस ठाण्यावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ते पुढे म्हणाले, संकेश्वरात मंगळवार दि. २ ऑगस्ट २०२२ रोजी कु. साई भास्कर काकडे (वय १४) हा मुलगा ट्यूशनहून घराकडे परतत असताना अपहरणकर्ते त्याला संकेश्वर बस स्टॅंड येथे गाठले. त्यांनी साईला तुझ्या वडिलांचा अपघात घडला आहे. त्यांना निपाणी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. तुझे वडील सिरीयस आहेत. असे सांगून कु. साईचे अपहरण केले. साईचे वडील भास्कर यांना अपहरणकर्त्याचा काॅल आल्यानंतर त्यांनी लागलीच संकेश्वर पोलिस स्टेशन गाठून आपला मुलगा अपहरण झाल्याची फिर्याद केली होती. संकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी यांनी जिल्हा पोलिस प्रमुख, सहाय्यक जिल्हा पोलिस प्रमुख, गोकाक डीएसपी मनोजकुमार नाईक, यमकनमर्डी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश छायागोळ यांच्या मार्गदर्शनाखाली लागलीच अपहरणकर्त्यांची शोध मोहीम हाती घेतली. संकेश्वर-गोकाक अपराध विभागाचे पोलिस अधिकारी पोलिस कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक राज्याची नाकाबंदी करुन वाहनधारकांची कसून चौकशी सुरू करताच अपहरणकर्त्यांचे धाबे दणाणले. ठिकठिकाणी पोलिसांचा सापळा पाहून अपहरणकर्त्यांनी आपला प्लॅन बदलला. त्यांनी कु. साईला होनेहोळी फाट्यावर सुखरुप सोडून तेथून पळ काढला होता. पैशांच्या खंडणीसाठी अपहरण नाट्य घडले होते. पोलिसांच्या कार्यतत्परतेने अपहरणकर्त्यांना प्लॅन बदलने भाग पडले.
ओळखीचा अपहरणकर्ता निघाला…
संकेश्वर पोलिसांनी गेले पंधरा दिवस अपहरणकर्त्यांचा शोध घेऊन आज २० ते २२ वयोगटातील सहा अपहरणकर्त्यांना गजाआड केले आहे. अपहरण प्रकरणाचा मास्टर माईंड ओळखीचा निघाला आहे. तो भास्कर काकडे यांच्या खास परिचयाचा असून तो जय जवान सलूनमध्ये कामाला असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचे नाव बबलू असून त्यांनी साईच्या अपहरण प्रकरणातून भास्कर काकडे यांच्याकडून पाच लाख रुपये लाटणेचा विचार आखला होता. त्याला साथ दिप्या आणि अन्य चौघांची असल्याचे पोलिस चौकशीतून समोर आले आहे.
अपहरणासाठी बाईकचा वापर…
अपहरण प्रकरणाचा मास्टर माईंड बबलू यांनी साईच्या अपहरणासाठी पाच आरोपींच्या मदतीने अपहरण नाट्य केल्याचे उघडकीस आले आहे. अपहरणासाठी आरोपींनी केए-22/ एच जे-7941, एम एच 09/ईएस-7401,केए 23/ईएस-0924 या मोटारसायकलींचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपींकडून अपहरण प्रकरणात वापरण्यात आलेली सहा मोबाईल हॅंडसेट पोलीसांनी जप्त केले आहे.
अखेर अपहरणकर्ते गजाआड…
अपहरणकर्त्यांचा तपास लावून त्यांना गजाआड करण्याचे काम बेळगांव जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. संजीव पाटील, सहाय्यक जिल्हा पोलिस प्रमुख, गोकाक डीएसपी मनोजकुमार नाईक, यमकनमर्डी पोलिस निरीक्षक रमेश छायागोळ यांच्या मार्गदर्शनाखाली संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी, पोलिस कर्मचारी बी. के. नांगनुरी, एम. जी. दादामलीक, एम. एम. जंबगी, एम. एम. करगुप्पी, बी. व्ही. हुलकुंद, वाय. एच. नदाफ, बी. टी पाटील, बी. एस कपरट्टी, बी. एन. मेलमट्टी, सचिन पाटील, विनोद ठक्कण्णावर यांनी करुन दाखविले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta