संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील गणेशोत्सव शासनाच्या नियमानुसारच साजरा करावा लागेल, असे पोलिस निरीक्षक गणपती कोगनोळी यांनी सांगितले. ते संकेश्वर पोलीस ठाण्यात आयोजित गणेशोत्सव शांतात सभेत बोलत होते. सभेचे अध्यक्षस्थान यमकनमर्डीचे पोलीस निरीक्षक रमेश छायागोळ यांनी भूषविले होते.
सभेला उद्देशून बोलताना गणपती कोगनोळी पुढे म्हणाले, संकेश्वरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणरायाच्या आगमन प्रसंगी आणि विसर्जन मिरवणुकीत “डीजे “लावायचे नाही. सुप्रिम कोर्टाने डीजेला मनाई केली आहे. सरकारने ठरवून दिलेल्या मार्गसुची आणि नियमानुसार गणेशोत्सव साजरा करावा लागेल. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी. रितसर परवानगी मिळविणे बंधनकारक आहे. रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत ध्वनीवर्धक बंधनकारक राहणार आहे. गणेशोत्सव मंडळांनी सरकारच्या नियमावलीनुसार बाप्पांचा उत्सव साजरा करावयाचा आहे. मंडळांनी गणरायाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीचा मार्ग पूर्ववत ठेवावयाचा आहे.
सिंगल विंडो (एक खिडकी) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सर्व परवानगी एकाच छताखाली मिळण्याची सोय करुन दिली जाणार आहे. मंडळांनी पालिका, अग्निशमन दल, विद्युत आणि पोलिसांची परवानगी मिळविणे बंधनकारक आहे. परवानगी शिवाय सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळा विरोध क्रम घेतला जाणार आहे. सरकारी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गणरायांचे विसर्जन १० च्या आत….
घरातील तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी दिवसभर विसर्जन मिरवणूक काढून रात्री १० च्या आत श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करावयाचे आहे. पालिकेने तयार केलेल्या कुत्रिम कुंडात श्री मूर्तीचे विसर्जन करावयाचे आहे. मोठ्या श्री मूर्तीचे विसर्जन हिरण्यकेशी नदीत करावयाचे आहे.
खुळ्यांचा बाजार नको…
यमकनमर्डीचे पोलीस निरीक्षक रमेश छायागोळ म्हणाले, श्री गणरायांचे आगमन आणि विसर्जन मिरवणूक पारंपारिक वाद्यांच्या गजरात करायला हवी. श्री गणरायाच्या मूर्ती पुढे कानठळ्या बसविणाऱ्या डीजेचा गजर करुन धिंगाणा घालणे हा खुळ्यांचा बाजार आहे. भारतीय संस्कृतीचे अनुकरण परदेशातील लोक करताहेत. आपण पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करून भावी पिढीला चुकीच्या मार्गाने नेत असल्याचे सांगितले.
यावेळी नगरसेवक डॉ. जयप्रकाश करजगी म्हणाले, श्री गणरायांचे आगमन पारंपारिक वाद्यांच्या गजरात करायला हवे आहे. भारतीय संस्कृती महान आहे. त्याचे जतन करणे आपणा सर्वांचे आद्य कर्तव्य असल्याचे सांगितले. यावेळी माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अमर नलवडे, संजय शिरकोळी, नंदू मुडशी, सचिन भोपळे, रोहण नेसरी, जितेंद्र मरडी, अभिजित कुरणकर, संतोष सत्यनाईक, संदिप दवडते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत आणि आभार हवालदार बी. के. नांगनुरी यांनी मानले.