


संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपती दर्शनाला भक्तांची अलोट गर्दी होताना दिसत आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे गणेश भक्तांना निलगार गणपतीचे दर्शन घेता आले नाही. त्यामुळे यंदा गणेश चतुर्थी पासूनच भक्तगण निलगार गणपती दर्शनाला हजेरी लावताना दिसत आहेत. निलगार गणपतीचे प्रमुख शिवपुत्र हेद्दुरशेट्टी, वीरभद्र हेद्दुरशेट्टी, हनुमंत हेद्दुरशेट्टी यांनी निलगार गणपतीचे दर्शन शुक्रवार दि. २ सप्टेंबर २०२२ पासून सुरू होणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी दर्शनाला आलेल्या भक्तगणांना दर्शनाचा लाभ घेता आलेला नाही. शुक्रवार दि. २ सप्टेंबर २०२२ पासून निलगार गणपतीचे दर्शन खुले झाल्यामुळे भक्तगण मोठ्या संख्येने हजेरी लावताना दिसत आहेत.
निलगार उत्सवाला यात्रेचे स्वरुप..
संकेश्वरातील हेद्दुरशेट्टी कुटुंबातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपतीची महिमा सर्व दूर पसरली आहे निलगार गणपती भक्तांच्या नवसाला पावणारा असल्याने कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्रप्रदेश राज्यातून लाखो भक्तगण दर्शनासाठी हजेरी लावतात. येथील आझाद रस्ता ते हेद्दुरशेट्टी यांच्या निवासस्थानापर्यंत रस्त्याच्या दोहो बाजूंनी पेढे स्टाॅल, नैवेद्य साहित्याची दुकाने, खेळणीची दुकाने, महिला प्रसाधनाची दुकाने, पाणीपुरी भेळचे स्टाॅल आकर्षकरित्या थाटण्यात आलेले दिसताहेत. त्यामुळे निलगार गणेश उत्सवाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झालेले दिसत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta