संकेश्वर (महंमद मोमीन) : हुक्केरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते एस.डी.व्ही.एस. कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले, प्रसार माध्यमांनी आपण बेळगांव उत्तर विधानसभा मतक्षेत्रातून निवडणूक लढविणार असल्याचा कांगावा चालविला आहे. पण आपण उतरचा विषय डोक्यात घेतलेला नाही. हुक्केरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणेचा निश्चय केला आहे. त्यात कदापी बदल करणार नाही. यापूर्वी आपण या गोष्टीचा खुलासा केलेला असला तरी प्रसार माध्यमांनी उत्तर विधानसभेचाच विषय उचलून धरलेला दिसत आहे. आपण प्रत्यक्षात बेळगांव उत्तर विधानसभेची निवडणूक लढविणार असे कोठेच सांगितलेले नाही. दिवंगत उमेश कत्तीं यांच्या निधनाने निवडणूक रिंगणात उतरणाऱ्या कत्ती कुटुंबातील सदस्याला लोकांची सहानुभूती लाभली तरी ती नगण्य राहणार आहे. निवडणुकीवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. आमचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो अभियानाला देशभरात उदंड प्रतिसाद मिळत आहे. लोक भाजपाच्या बेबंदशाही राजवटीला अक्षरशा कंटाळ्ले आहेत. त्यामुळे देशभरात लोक काॅंग्रेसला साथ देताना दिसत आहेत.
कर्नाटकात सत्ता पालटणार..
कर्नाटकातील सरकार सर्व स्तरावर अपयशी ठरले आहे. भाजपाच्या मंत्र्यांची ४० टक्के कमिशनचा विषय जगजाहीर झाला आहे. त्यामुळे सत्तारुढ सरकार बदनाम झाले आहे. याचा फायदा आगामी निवडणुकीत निश्चितच काॅंग्रेसला मिळणार आहे. आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसचे १४० आमदार निवडून येणार यात तीळमात्र शंका नाही. बेळगांव जिल्ह्यातून काॅंग्रेसचे १२ उमेदवार मताधिक्याने निवडून येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta