हुक्केरी : तालुक्यातील गुडस गावात असलेल्या लक्ष्मी मंदिराजवळ चंदनाची अवैध वाहतुक करणाऱ्यांवर वनविभागाच्या पथकाने छापा टाकून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.
रायबाग तालुक्यातील खनदाळ गावातील पुंडलिक बजंत्री आणि परसप्पा बजंत्री यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदनाच्या तुकड्यांची वाहतुक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावर सोमवारी सायंकाळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकाने गाडीवर छापा टाकला.
यावेळी सुमारे ४ लाख रुपये किमतीचे ४० किलो चंदन, ४ लाख रुपये किमतीची कार असा एकूण ८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मुख्य वनसंरक्षक मंजुनाथ चव्हाण, उपवनसंरक्षक एस. एस. कल्लोळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक शिवरुद्रप्पा कबाडगी, प्रादेशिक विभागीय वन अधिकारी प्रसन बेल्लद, उपविभागीय वन अधिकारी विष्णुकुमार नायक, गस्ती वनपाल रायप्पा बबली व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
कारवाईदरम्यान पळून गेलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जाळे टाकले आहे. याप्रकरणी प्रादेशिक वनीकरण विभागात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. या प्रकरणातील आरोपी हे बनावट पत्रकार असल्याची माहिती आहे.