संकेश्वर : संकेश्वर बायपास रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास चालत्या वाहनांवर दगडफेक केल्याची घटना 30 मे रोजी मध्यरात्री 12 ते 1 च्या सुमारास घडली. अंधाराचा फायदा घेत वाहनांवर दगडफेक करून लुटण्याचा प्रयत्न असल्याची शंका प्रवाशांतून व्यक्त होत आहे.
30 मे रोजी मध्यरात्री संकेश्वर बायपास रस्त्यावर चालत्या वाहनावर दगडफेक करून वाहने अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र वाहन चालकांच्या सावधानतेमुळे त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी झाला. 30 मे रोजी रात्रभरात जवळपास सात ते आठ वेगवेगळ्या वाहनांवर दगड फेकल्यामुळे समोरच्या व आजूबाजूच्या काचा फुटून वाहनांचे बरेच नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. अशा अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी या बायपास रस्त्यावर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविणे गरजेचे आहे. जेणेकरून रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणतीही अडचण होऊ नये. रात्रीचा प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी वाहन चालवताना सावधानता बाळगणे गरजेचे आहे. रात्री- अपरात्री अशा रस्त्यांवर कोणत्याही परिस्थितीत वाहने थांबवू नये व सावधानतेने वाहन चालविणे गरजेचे आहे.