संकेश्वर : संकेश्वर नगरपालिकेसाठी नुकताच अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी सरकारने आरक्षण जाहीर केले असून नगराध्यक्षपद हे जनरल महिला तर उपनगराध्यक्ष मागासवर्गीय अ गटासाठी आरक्षण जाहीर झाले आहे यामुळे इच्छुकांचे लक्ष अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणूक तारखेकडे लागले असून तद्नंतर कोण बनेगा नगराध्यक्ष याची खमंग चर्चा नागरिकात रंगली आहे.
नगरपालिकेत भाजपची सत्ता असून भाजपकडे 12, काँग्रेसकडे 9, अपक्ष 1 अशी एकूण 22 नगरसेवक आहेत. तब्बल दीड वर्षानंतर हे आरक्षण जाहीर झाल्यामुळे राजकीय गोठात चर्चेचा विषय बनला आहे. नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून सौ. सीमा हतनुरे, सुचित्रा परीट, श्रीविद्या बांबरे, मनोरमा सुगते, तर काँग्रेसकडून शेवंता कब्बूरी सविता नष्टी यांची नावे चर्चेत आहेत.
तर उपनगराध्यक्ष पदासाठी भाजप वतीने सचिन भोपळे, विवेक क्वळी, काँग्रेस वतीने डॉ. जयप्रकाश करजगी, अपक्ष अजित करजगी यांच्या नावाची चर्चा आहे. यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्षचा उर्वरित कालावधी केवळ 15 महिन्याचा असल्याने ‘मेरा नंबर कब आयेगा’ अशी स्थिती इच्छुक नगरसेवकांची झाली आहे.