
विज्ञानाला प्राधान्य द्या : राहुल जारकीहोळी
यमकनमर्डी : सतीश जारकीहोळी फाउंडेशनच्या वतीने दड्डी आणि हुनूर मास्तीहोळी क्लस्टरअंतर्गत येणाऱ्या वरिष्ठ प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन शुक्रवारी हुक्केरी तालुक्यातील अलदाळ गेस्ट हाऊसमध्ये करण्यात आले.
या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बीडीसीसी बँकेचे संचालक राहुल जारकीहोळी यांनी रोख बक्षीस व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविले.
यावेळी बोलताना राहुल जारकीहोळी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयात अधिक रुची घेतल्यास त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल. माध्यमिक शालेय टप्प्यापासूनच विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच पाठ्येतर उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले. त्यांनी सांगितले की, आपले वडील व मंत्री सतीश जारकीहोळी हे या भागातील विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात प्रगती करावेत या उद्देशाने गेल्या वीस वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवत आहेत.
सतीश जारकीहोळी फाउंडेशनकडून युवकांसाठी मोफत आय ए एस, के ए एस, पोलीस, आर्मी प्रशिक्षण तसेच कौशल्यविकास प्रशिक्षण दिले जात असून युवकांचे भविष्य घडवण्याचे कार्य सुरू आहे, असे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थी व युवकांचा कणा म्हणून आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहू. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात या भागातील विद्यार्थ्यांचे नाव अग्रभागी असावे, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला मंत्र्यांचे निकटवर्तीय सहाय्यक दयानंद पाटील, शिक्षण विभागाचे अधिकारी ए. एस. पद्मन्नवर, गोविंद दीक्षित, सीआरपी एस. एच. बेटगेरी तसेच नेते बसवराज देसाई, तानाजी सुंडकर, शरद प्रधान, गणपती कांबळे, अशोक तळवार, उदय पाटील,महेश गुमची, रामचंद्र कम्मार, शिक्षक, विद्यार्थी व परिसरातील अनेक नेते उपस्थित होते.
प्रास्ताविक एम. सी. पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन मांतेश पूजेरी यांनी केले.
माध्यमिक शाळा विभागातील विजेते
1. एस. बी. एच. एस. दड्डी, 2. जी. एच. एस. नागनूर, 3. जी. एच. एस. मास्तीहोळी, 4. जी. एच. एस. अत्तिहाळ, 5. एम. व्ही. मोदगा शाळेचे विद्यार्थी
प्राथमिक शाळा विभागातील विजेते
1. एम. एच. पी. एस. शट्टीहळ्ळी, 2. के. एच. पी. एस. दड्डी, 3. एम. एच. पी. एस. मनगुत्ती, 4. एम. एच. पी. एस. कोट, 5. के. एच. पी. एस. गुडगनहट्टी
या सर्व शाळांतील विद्यार्थी विजेते ठरले असून, सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta