बर्मिंघम : भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाने 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. अंतिम सामन्यात भारताने सिंगापूरचा 3-1 असा पराभव केला. भारतासाठी हरमीत देसाई आणि जी साथियान यांनी दुहेरीच्या सामन्यात विजयाची नोंद करून भारताला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, च्यु झे यू क्लेरेन्सने पुढील गेम जिंकून सिंगापूरला 1-1 अशी बरोबरी साधली. पण जी. साथियान आणि हरमीत देसाई यांनी आपापले सामने जिंकून भारताचे सुवर्णपदक निश्चित केले.
2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत 12 पदके जिंकली आहेत, ज्यात पाच सुवर्ण, चार रौप्य आणि तीन कांस्य पदकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे आठ पदके वेटलिफ्टिंगमध्ये आली आहेत. त्याचबरोबर भारताने ज्युदोमध्ये दोन पदके जिंकली आहेत. तसेच लॉन बॉलमध्ये महिला संघ आणि टेबल टेनिसमध्ये पुरुष संघाने सुवर्ण पदक जिंकले.
पुरुषांच्या टेबल टेनिसच्या सांघिक स्पर्धेत भारताने सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकले आहे. 2018 गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्समध्येही भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाने सुवर्ण पदक जिंकले होते. त्यावेळी अंतिम सामन्यात भारतीय संघाने नायजेरियाचा 3-0 असा पराभव केला होता.