पोर्ट ऑफ स्पेन : सूर्यकुमार यादव व श्रेयस अय्यर या जोडीने भारताला वाटचाल विजयाच्या दिशेने करून दिली. वेस्ट इंडिजच्या १६४ धावांचा पाठलाग करताना भारताकडून सडेतोड उत्तर मिळाले. रोहित शर्मा ११ धावांवर पाठीच्या दुखण्यामुळे रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर सूर्या व श्रेयस या मुंबईकरांनी ५९ चेंडूंत ८६ धावांची भागीदारी करून भारताच्या विजयाचा मजबूत पाया रचला. सूर्या ४४ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकार खेचून ७६ धावांवर बाद झाला. भारताने ७ विकेट्स राखून तिसरा सामना जिंकत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.
कायले मेयर्स व ब्रेंडन किंग्स (२०) या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांवर सुरुवातीपासून प्रहार केला आणि ५७ धावांची भागीदारी केली. कायले मेयर्स ५० चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारांसह ७३ धावा करून बाद झाला. शिमरोन हेटमायर व रोव्हमन पॉवेल यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करताना भारतासमोर आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. २०व्या षटकात अर्शदीप सिंगने सलग दोन चौकार खेचणाऱ्या रोव्हमन पॉवेलला तिसऱ्या चेंडूवर बाद केले. पॉवेलने १४ चेंडूंत २३ धावा केल्या. हेटमायरही १२ चेंडूंत २० धावा करून धावबाद झाला. विंडीजने ५ बाद १६४ धावा केल्या.
वेस्ट इंडिजच्या १६४ धावांना प्रत्युत्तरात रोहित शर्माने चांगली सुरुवात करून दिली. दुसऱ्या षटकात अल्झारी जोसेफला त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला, तर तिसऱ्या चेंडूवर चौकार मारला. पण, पुढच्याच चेंडूवर पाठीच्या दुखण्यामुळे तो रिटायर्ड हर्ट झाला. श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतकी भागीदारी करून भारताचा डाव सावरला. सूर्याने २६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. सूर्याने ट्वेंटी-२० क्रिकेटच्या २० डावांत आतापर्यंत ५ अर्धशतकं व १ शतक झळकावले आहे. सूर्या विंडीजच्या गोलंदाजांना चांगला कुटत होता. अय्यर सहाय्यक नायकाच्या भूमिकेत विकेट टिकवून सूर्याच्या फटकेबाजीचा आनंद लुटताना दिसला.
या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५९ चेंडूंत ८६ धावा चोपल्या. श्रेयस २४ धावांवर, तर सूर्यकुमार ७६ धावांवर बाद झाला. भारताला ३२ चेंडूंत ३० धावा करायच्या होत्या आणि हातात ७ विकेट्स होत्या. रिषभ पंत सुसाट सुटला होता आणि त्याने चौकार-षटकार मारायला सुरुवात केली. हार्दिक पांड्या ४ धावांवर माघारी परतला. रिषभने २६ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह नाबाद ३३ धावा केल्या, दीपक हुडाने नाबाद १० धाव केल्या. भारताने १९ षटकांत ३ बाद १६५ धावा करून सामना जिंकला.