बर्मिंघम : भारतीय कुस्तीगीरांनी शुक्रवारी पदकसंख्येत चार पदकांची मोलाची भर घातली. ऑलिम्पिक पदक विजेत्या बजरंग पुनिया(६५ किलो), दीपक पुनिया (८६ किलो) आणि साक्षी मलिक (६२ किलो) यांनी सुवर्णपदक पटकावले, तर अंशु मलिकला (५७ किलो) रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
साक्षी भारताची एक अनुभवी कुस्तीपटू असल्याने ती कॉमनवेल्थमध्ये सुरुवातीपासून दमदार फॉर्ममध्ये होती. फ्री स्टाईल 62 किलोग्राम गटात तिने राऊंड 16 पासून उत्तम खेळ दाखवत एक-एक फेरी गाठली. सेमीफायनलमध्ये साक्षीने इंग्लंडच्या खेळाडूला मात देत फायनल गाठली आणि भारतासाठी एक पदक निश्चित केलं. पण हे पदक सुवर्णच असावं यासाठी सारे प्रयत्न केले आणि ते यशस्वी करुन दाखवत अखेर फायनलमध्ये कॅनडाच्या ऍना गोंझालेजला मात देत सुवर्णपदक मिळवलं. विशेष म्हणजे फायनलचा सामना अत्यंत अटीतटीचा झाला होता. एका क्षणी 4-0 च्या आघाडीवर ऍना होती पण साक्षीने जोरदार कमबॅक करत स्कोर 4-4 असा बरोबरीत आणला आणि अखेर विजय मिळवला.
महिला विभागातील ५७ किलो लढतीत अंशू मलिकला नायजेरियाच्या ओडुनायो अॅडेकुओरोयेचे आव्हान पेलवले नाही. अंशूला सुवर्णपदकाच्या लढतीत ओडुनायोकडून ३-७ असा पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या ८६ किलो वजनी गटात भारताच्या दीपक पुनियाने पाकिस्तानच्या मुहम्मद इनामविरुद्ध ३-० अशी बाजी मारली.