नवी दिल्ली : आशिया खंडातील देशांसाठी विश्वचषकानंतर सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा म्हणजे आशिया कप. तर यंदाच्या आशिया कपसाठीचं वेळापत्रक काही दिवसांपूर्वीच जाहीर झालं होतं. त्यानंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने स्पर्धेसाठीचा भारतीय संघ जाहीर केला आहे. यावेळी रोहित शर्मा कर्णधार तर केएल राहुल उपकर्णधार असणार आहे. विशेष म्हणजे दुखापतीमुळे अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह स्पर्धेला मुकणार आहे. विराटलाही संघात संधी मिळाली आहे.
कसा आहे भारतीय संघ?
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन आश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.
अनुभवी खेळाडूंना डच्चू
भारतीय संघाचा विचार करता यामध्ये काही दिग्गज खेळाडूंना डावलण्यात आलं आहे. ज्यामध्ये सलामीवीर शिखऱ धवन, गोलंदाज मोहम्मद शमी यांचा समावेश आहे. शिखर मागील काही काळापासून फॉर्ममध्ये आहे. आयपीएलमध्येहील त्याने चांगली कामगिरी केली. पण तरीही त्याला सलामीवीर म्हणून संघात स्थान मिळालं नाही. याशिवाय मोहम्मद शमीसारखा अनुभवी गोलंदाजही संघात नसल्याचं दिसून आलं आहे. बुमराह दुखापतीमुळे बाहेर असल्याने अनुभवी गोलंदाज म्हणून भुवनेश्वर कुमारच संघात आहे. तसंच ईशान किशन, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर या युवांनाही संधी मिळालेली नाही. दीपक हुडाला मात्र संघात स्थान मिळालं आहे.