Thursday , September 19 2024
Breaking News

भारत आणि पाकिस्तान आज आमनेसामने

Spread the love

 

दुबई : भारत आणि पाकिस्तान हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सामना आज रंगणार आहे. आशिया कप 2022 स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली. आता युएईतल्या ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकात आज रोहित शर्माच्या टीम इंडियाचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होणार आहे. बाबर आझमच्या पाकिस्तानी फौजेनं टीम इंडियाचं विश्वचषकातलं निर्विवाद वर्चस्व मोडून काढलं, त्याला जेमतेम दहा महिने उलटलेयत. योगायोगाची गोष्ट म्हणजे बाबर आझमच्या फौजेनं तो ऐतिहासिक विजय मिळवला, त्याच मैदानात आज भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येत आहेत.

ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या रणांगणात पाकिस्तानकडून टीम इंडियाच्या झालेल्या या पराभवाला दहा महिने उलटलेयत. पण दुबईतल्या त्या पराभवानं करोडो भारतीय क्रिकेटरसिकांच्या हृदयावर झालेली जखम अजूनही ओली आहे.

विराट कोहली आणि त्याच्या टीम इंडियाच्या त्या मानहानीचा वचपा काढण्याचा मौका रोहित शर्मा आणि त्याच्या टीम इंडियाला मिळणार आहे. यावेळी रणांगण ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकाचं असलं, तरी योगायोगाची बाब म्हणजे बाबर आझमच्या फौजेनं विराटसेनेचा दहा विकेट्सनी धुव्वा उडवला त्याच दुबईच्या मैदानात पाकिस्तानवर बाजी उलटवण्याचा मौका रोहित शर्माच्या टीम इंडियाला मिळणार आहे.

ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या रणांगणात विराट कोहलीच्या टीम इंडियाचा कर्दनकाळ ठरला होता तो डावखुरा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदी. त्यानं रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि सूर्यकुमार यादवला अवघ्या 31 धावांत माघारी धाडून विराटसेनेच्या पराभवाचं भविष्य आधीच लिहिलं. मग मोहम्मद रिझवान आणि बाबर आझमच्या अभेद्य सलामीनं भारतीय मनावरच्या जखमेवर पराभवाचं मीठ चोळलं.

पाकिस्तानचा तो विजय टीम इंडियाची ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटमधली आजवरची सर्वात मोठी नामुष्की ठरली. कारण या विजयानं ट्वेन्टी ट्वेन्टीच्या इतिहासात प्रतिस्पर्ध्यांवर दहा विकेट्सनी मात करणारा पहिला संघ ठरण्याचा मान पाकिस्तानला मिळवून दिला. इतकंच काय, पण आयसीसी विश्वचषकाच्या इतिहासात भारताची पाकिस्तानवरची निर्विवाद वर्चस्वाची परंपराही बाबर आझमच्या फौजेनं मोडून काढली. तोवर तब्बल 29 वर्ष टीम इंडिया पाकिस्तानसमोर अपराजित होती. या 29 वर्षांत भारतानं पाकिस्तानवर वन डे विश्वचषकात सात आणि ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात पाच विजयांची नोंद केली होती.

टीम इंडियाची विश्वचषकातली मक्तेदारी मोडून काढणारा पाकिस्तानचा तो विजय भारतीय क्रिकेटरसिकांच्या जिव्हारी लागलाय. त्या जखमेवर ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकात फुंकर घालण्याची जबाबदारी आता रोहित ब्रिगेडची आहे.

टीम इंडियाच्या सुदैवानं ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटचा इतिहास रोहित ब्रिगेडच्या बाजूनं आहे. उभय संघांमध्ये आजवर झालेल्या नऊ ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये भारतानं सहा, तर पाकिस्ताननं केवळ दोनच सामन्यांमध्ये विजय मिळवलाय. भारत आणि पाकिस्तान संघांमधला पहिला ट्वेन्टी ट्वेन्टी सामना टाय झाला होता.

भारत आणि पाकिस्तान संघांमधली ही कागदावरची आकडेवारी प्रत्यक्ष रणांगणावर अर्थहीन ठरणार असली तरी शाहिन आफ्रिदीची अनुपस्थिती पाकिस्तानच्या दृष्टीनं आशिया चषकात चिंतेची बाब ठरण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तान संघांची ताकद लक्षात घेता उभय संघ साखळी सामन्यापाठोपाठ सुपर लीग आणि कदाचित फायनलमध्येही आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

About Belgaum Varta

Check Also

विनेश फोगटची रौप्य पदक मागणीची याचिका क्रीडा लवादाने फेटाळली

Spread the love  नवी दिल्ली : भारताची पैलवान विनेश फोगाट हिला मोठा धक्का बसला आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *