नवी दिल्ली : आयसीसीने जाहीर केलेल्या टी-20 क्रमावारीत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला मोठा फायदा झाल्याचं पाहायला मिळतोय. नुकतीच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धत दमदार प्रदर्शन करणार्या विराटला ’प्लेअर ऑफ टूर्नामेन्ट’ म्हणून गौरवण्यात आलं. ज्याचा फायदा त्याला मिळाला. जवळपास तीन वर्षांपासून खराब फॉर्मशी झुंज देणार्या विराट कोहलीनं टी-20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या क्रमवारीत 14 स्थानांनी झेप घेतली असून तो 15व्या स्थानावर पोहोचलाय.
आयसीसी टी-20 क्रमवारीत भारताचा युवा आणि मधल्या फळीचा फलंदाज सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर आहे. तर, भारताचा कर्णधार रोहित शर्मा 14 व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा विकेटकिपर फलंदाज मोहम्मद रिझवान टी-20 क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. तसेच दिर्घकाळापासून टी-20 अव्वल स्थानावर कब्जा केलेल्या पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची तिसर्या क्रमांकावर घसरण झालीय. तर, दक्षिण आफ्रिकेचा एडेन मार्कराम दुसर्या क्रमांकावर पोहचलाय.
आयसीसी टी-20 गोलंदाजांच्या क्रमवारीत भुवनेश्वर कुमारला एका स्थानानं नुकसान झालंय. भुवनेश्वर कुमारची सहाव्या स्थानावरून सातव्या स्थानावर घसरण झालीय. ऑस्ट्रेलियाचा जोश हेजलवुड आयसीसी टी-20 गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. तर, आयसीसी टी-20 ऑलराऊंडरच्या यादीत बांगालादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसन पहिल्या क्रमांकावर आहे. तर, अफगाणिस्तानचा ऑलराऊंडर मोहम्मद नबी दुसर्या क्रमांकावर आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचीही एका स्थानानं घसरण झालीय. तो सातव्या क्रमांकावर पोहचलाय.
Belgaum Varta Belgaum Varta