मोहाली : ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी केएल राहुलचे भारतीय संघातील स्थान अढळ असून माझ्यासह तोच सलामीसाठी पहिली पसंती असेल. आमच्याकडे विराट कोहलीचाही पर्याय उपलब्ध आहे आणि विश्वचषकापूर्वीच्या काही सामन्यांत त्याला सलामीला पाठवण्याचा आम्ही विचार करत आहोत, असे विधान भारताचा कर्णधार रोहित शर्माने केले.
उद्या मंगळवार दि. 20 पासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेच्या पार्श्वभूमीवर रोहितने रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर होणारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन सामन्यांची ट्वेन्टी-२० मालिका भारतीय संघासाठी महत्त्वाची ठरेल, असे रोहितला वाटते. तसेच संघ व्यवस्थापनाने सर्व खेळाडूंशी संवाद साधून त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा आणि त्यांची भूमिका स्पष्ट केल्याचेही रोहित म्हणाला.
‘‘ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी विराट हा आमचा तिसरा सलामीवीर आहे. त्यामुळे विश्वचषकापूर्वी काही सामन्यांत त्याला सलामीला पाठवण्याबाबत माझ्यात आणि प्रशिक्षक राहुल द्रविडमध्ये चर्चा झाली आहे. गेल्या सामन्यात सलामीवीर म्हणून खेळताना विराटने उत्कृष्ट कामगिरी केली असून आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे,’’ असे रोहितने सांगितले.
विराटने याच महिन्यात झालेल्या आशिया चषक ट्वेन्टी-२० स्पर्धेतील अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात सलामीला येताना नाबाद १२२ धावांची खेळी केली होती. हे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ७१वे आणि नोव्हेंबर २०१९ नंतरचे पहिले शतक होते. विराटला सूर गवसल्याचा आनंद असला, तरी सलामीवीराच्या स्थानासाठी राहुलला पहिली पसंती असल्याचे रोहितने स्पष्ट केले.
खेळाडूंना धोका पत्करण्याची मोकळीक!
ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी संघ जाहीर झाल्यामुळे खेळाडूंना आपल्या स्थानाबाबत सुरक्षितता आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत खेळाडूंना निडरपणे खेळता येईल. आम्ही सर्व खेळाडूंना धोका पत्करण्याची मोकळीक दिली आहे, असे रोहितने सांगितले. ‘‘आम्हाला खेळाडूंना सुरक्षितता द्यायची होती. त्यामुळेच आम्ही दोन मालिकांपूर्वीच विश्वचषकाच्या संघाची घोषणा केली. आशिया चषकातही आमचा साधारण हाच संघ होता. आता पुढील सहा सामन्यांत खेळाडूंनी धोका पत्करावा आणि विविध गोष्टी करून पाहाव्यात अशी माझी इच्छा आहे. आम्ही त्यांना पूर्ण मोकळीक देणार आहोत. त्यांच्यावर दडपण नसेल,’’ असे रोहित म्हणाला.