मोहाली : भारताच्या २०८ धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने दमदार खेळ केला. कर्णधार आरोन फिंच माघारी परतल्यानंतर कॅमेरून ग्रीन व स्टीव्ह स्मिथ यांनी १० च्या सरासरीने धावा करताना १० षटकांत शतकी पल्ला गाठून दिला. उमेश यादवने १२व्या षटकात दोन विकेट्स घेत सामना फिरवला. अक्षर पटेलने उपयुक्त गोलंदाजी करून भारताला विजयी मार्गावर ठेवले होते, परंतु हर्षल पटेलने टाकलेल्या १७व्या षटकात ऑसींनी पुन्हा सामना फिरवला. हार्दिक पांड्या, लोकेश राहुल व सूर्यकुमार यादव यांच्या मेहनतीवर गोलंदाजांनी पाणी फिरवले. सोडलेले दोन झेलही महागात पडले. भारतीय गोलंदाजांना २०८ धावांचा बचाव करता आला नाही आणि ऑस्ट्रेलियाने विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
कॅमेरून ग्रीन व आरोन फिंच यांनी ऑस्ट्रेलियाला आक्रमक सुरुवात करून दिली. भुवनेश्वर कुमार व उमेश यादव यांच्यावर या दोघांनी हल्लाबोल केला, पण रोहितने लगेच अक्षर पटेलला गोलंदाजीला आणले. त्याने विश्वास सार्थ ठरवताना फिंचला २२ (१३ चेंडू) धावांवर बाद करून ऑस्ट्रेलियाला ३९ धावांवर पहिला धक्का दिला. ४४ धावांवर ग्रीनचा झेल अक्षर पटेलकडून सुटला. नवव्या षटकात लोकेश राहुलकडून स्मिथचा (१८) झेल सुटला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त प्रथमच सलामीला आलेल्या कॅमेरून ग्रीनने २६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. १० षटकात ऑस्ट्रेलियाने १ बाद १०९ धावा केल्या, परंतु ब्रेकनंतर अक्षर व उमेश यादव यांनी सामना फिरवला.
अक्षरच्या गोलंदाजीवर ग्रीनने पुन्हा उत्तुंग फटका मारला अन् विराटने सुरेख झेल टिपला. ग्रीन ३० चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारासह ६१ धावा करून बाद झाला. १२ व्या षटकात उमेश यादवने ऑस्ट्रेलियाला दोन मोठे धक्के दिले. स्मिथ ३५ आणि मॅक्सवेल १ धावेवर बाद झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मैदानावरील अम्पायरने या दोघांना नाबाद दिले होते, परंतु DRS घेत भारताने हे निर्णय बदलण्यास भाग पाडले. अक्षरने आणखी एक विकेट घेत जोश इंग्लिसला (१७) बाद केले. अक्षरने ४ षटकांत १७ धावांत ३ विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाला हाताशी ५ विकेट्स असताना ३० चेंडूंत ६१ धावा हव्या होत्या. हर्षल पटेलने १६व्या षटकात चौकार खाऊनही ६ धावा दिल्या. पण, भुवीने टाकलेल्या १७व्या षटकात १५ धावा मिळाल्या. १८ चेंडूंत ४० धावा हव्या असताना हर्षलचा पहिलाच चेंडू मॅथ्यू वेडने सीमापार पाठवला. पुढच्याच चेंडूवर हर्षलेन रिटर्न कॅच टाकला. पदार्पणवीर टीम डेव्हिडनेही षटकार खेचून पुढे १ धाव घेत वेडला स्ट्राईक दिली. त्यानंतर वेडने ६, २ अशा धावा करताना त्या षटकात २२ धावा कुटल्या.
आता ऑस्ट्रेलियाला १२ चेंडूंत १८ धावा करायच्या होत्या अन् भुवीच्या षटकात १६ धावा आल्या. ६ चेंडूंत २ धावा हव्या असताना टीम डेव्हिड १८ धावांवर बाद झाला, पण त्यानंतर आलेल्या पॅट कमिन्सने चौकार खेचून ऑस्ट्रेलियाचा विजय पक्का केला. ४ विकेट्सने हा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मॅथ्यू वेड २१ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ४५ धावांवर नाबाद राहिला.
हार्दिक पांड्याचे वादळ..
नाणेफेक गमावल्यानंतर भारत प्रथम फलंदाजीला आला. रोहित (११ ) व विराट (२) धावांवर माघारी परतले. २ बाद ३५ वरून लोकेश राहुल व सूर्यकुमार यादव यांनी भारताला डाव सावरला. लोकेश व सूर्यकुमार यादव यांची ४२ चेंडूंवरील ६८ धावांची भागीदारी केली. लोकेश ३५ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५५ धावांवर माघारी परतला. सूर्याने २५ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ४६ धावा केल्या. अक्षर पटेल (६) व दिनेश कार्तिक (६) आज फार कमाल करू शकले नाही. हार्दिक पांड्याचे वादळ नंतर घोंगावले. त्याने २०व्या षटकात सलग तीन षटकार खेचले आणि ३० चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ७१ धावा केल्या. भारताने ६ बाद २०८ धावांचा टप्पा गाठला.
Belgaum Varta Belgaum Varta