लॉर्ड्सवर : भारतीय महिला क्रिकेट संघाने तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा 16 धावांनी पराभव केला. त्यामुळे भारतीय संघाने ती वनडे सामन्यांची ही मालिका 3-0 ने जिंकली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने 168 धावा केल्या. भारताच्या 169 धावांना प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा संघ 43.4 षटकात अवघ्या 153 धावांवर गारद झाला. भारतीय अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामीचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. हा सामना जिंकून भारतीय संघ झुलन गोस्वामीला संस्मरणीय निरोप देण्यात यशस्वी झाला. झुलन गोस्वामीने देखील शेवटच्या सामन्यात शानदार गोलंदाजी केली. तिने 10 षटकांत 30 धावा देत दोन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. शेफाली वर्मा आणि यास्तिका भाटिया एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतल्या. मात्र, स्मृती मानधनाने 79 चेंडूत 50 धावा केल्या. याशिवाय दीप्ती शर्माने नाबाद 68 धावांचे योगदान दिले. भारतीय संघाचे पाच फलंदाज आज खातेही उघडू शकले नाहीत. तर टीम इंडियाच्या 8 फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही.
इंग्लंडकडून केट क्रॉसने 10 षटकात 26 धावा देत 4 बळी घेतले. तर फ्रे कॅम्प आणि ऍस्लेस्टन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. एफ. डेव्हिस आणि शार्लोट डीन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. भारताच्या 169 धावांना प्रत्युत्तर देताना इंग्लंड संघाची सुरुवात खराब झाली. इंग्लंड संघाचे 7 फलंदाज 65 धावांपर्यंत पॅव्हेलियनमध्ये परतले होते. मात्र, अॅमी जोन्स आणि शार्लोट डीनने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण इंग्लंड संघाला लक्ष्य गाठता आले नाही. भारताकडून रेणुका सिंगने 10 षटकात 29 धावा देत 4 बळी घेतले. तर झुलन गोस्वामी व राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. याशिवाय दीप्ती शर्माने एक बळी घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta