नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयची मंगळवारी अर्थात 18 ऑक्टोबर रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. यावेळी भारताचे माजी क्रिकेटर रॉजर बिन्नी यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार आहे. बिन्नी हे कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष असून त्यांना राज्य संस्थेतून पायउतार व्हावं लागणार आहे. याशिवाय आयसीसी चेअरमनबद्दलही यावेळी चर्चा होणार आहे. बीसीसीआयच्या नवीन कमिटीसाठी सर्व सदस्यांची बिनविरोध निवड होणार हे जवळपास निश्चित असल्याने ही निवडणूक केवळ औपचारिकता आहे. पण बीसीसीआय आयसीसीच्या चेअरमन म्हणून नवीन उमेदवार उभा करणार की विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांना दुसऱ्यांदा पाठिंबा दिला जाईल यावर यावेळी चर्चा होईल.
मेलबर्नमध्ये 11 ते 13 नोव्हेंबर दरम्यान आयसीसी बोर्डाची बैठक होणार आहे. दरम्यान सध्या होणाऱ्या बीसीसीआय अध्यक्ष पदाचा विचार करता गांगुलीच्या अध्यक्ष पदावरुन खाली उतरण्याची क्रीडाच नव्हे तर राजकीय वर्तुळातही बरीच चर्चा झाली होती. त्यामुळे आता गांगुलीचा बीसीसीआयतर्फे नियक्त होणाऱ्या आयसीसीच्या इतर पदासाठी विचार होतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. या पदासांठी क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्याही नावांची चर्चा आहे.
‘रॉजर बिन्नीच अध्यक्ष’
रॉजर बिन्नी हे अध्यक्ष पदासाठी योग्य उमेदवार असणार असून याबद्दल बोलताना बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले, “केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा यांनीही बीसीसीआयचे सचिव म्हणून अर्ज दाखल केला आहे. जर कोणीही या पदासाठी अर्ज दाखल न केल्यास जय शाह दुसऱ्यांदा बीसीसीआयचे सचिव म्हणून कार्यरत राहतील. महत्वाचं म्हणजे, रॉजर बिन्नी यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी, जय शाहनं सचिवपदासाठी, आशिष शेलार यांनी खजिनदारपदासाठी आणि देवजित सैकिया यांनी संयुक्त सचिवपदासाठी अर्ज दाखल केले आहेत”. तसंच “अरुण धुमल आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे प्रमुख असतील आणि अभिषेक दालमिया देखील त्या परिषदेचा भाग असतील. खेरुल जमाल (मामून) मजुमदार हे सर्वोच्च परिषदेचा भाग असतील. आतापर्यंत याच लोकांनी अर्ज दाखल केले आहेत आणि सर्व बिनविरोध आहेत.” असंही शुक्ला म्हणाले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta