नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत कमाल करून दाखवली. विराटने वनडेमधील ४४वे शतक पूर्ण केले. विराटच्या बॅटमधून ४० महिन्यानंतर वनडेमध्ये शतक आले.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विराटने ११३ धावा केल्या. त्याने ९१ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकार मारले. या खेळीत विराटने ईशान किशनसोबत २९० धावांची विक्रमी भागिदारी केली. विराटचे हे शतक तब्बल ३ वर्षानंतर झाले आहे.
विराटची शतकं
वनडे- ४४
कसोटी- २७
टी-२०- ०१
वनडेमधील या शतकासह विराटने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या शतकांचा विक्रम मागे टाकला. विराटच्या नावावर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७२ शतक झाली आहेत. तर पॉन्टिंगच्या नावावर ७१ शतक आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट आता दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या यादीत सचिन तेंडुलकर १०० शतकांसह अव्वल स्थानी आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक शतक
सचिन तेंडुलकर-१००
विराट कोहली- ७२
रिकी पॉन्टिंग- ७१
वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक शतक
सचिन तेंडुलकर- ४९
विराट कोहली- ४४
रिकी पॉन्टिंग- ३०
रोहित शर्मा- २९
एक शतक आणि दोन विक्रम
बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यात विराट कोहलीने आणखी दोन विक्रम स्वत:च्या नावावर केले. विराटने १६वी धाव घेताच त्याचे बांगलादेशमध्ये वनडेत १ हजार धावांचा टप्पा पार झाला. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय तर जगातील दुसरा फलंदाज ठरला. त्यानंतर शतकी खेळीत त्याने बांगलादेशमध्ये वनडेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला. हा विक्रम कुमार संगकाराच्या नावावर होता. त्याने २१ वनडेत ५२.२५च्या सरासरीने १ हजार ४५ धावा केल्या होत्या. यात ३ शतक आणि १० अर्धशतकांचा समावेश होता.
Belgaum Varta Belgaum Varta