केपटाऊन : भारतीय संघाने रविवारी महिला टी२० विश्वचषकातील आपल्या मोहिमेला विजयाने सुरुवात केली. भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होता. केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे हा सामना खेळला गेला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २०षटकांत ४ गडी गमावून १४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने १९व्या षटकात तीन विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. जेमिमाह रॉड्रिग्स-रिचा घोषच्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिलांनी विश्वचषकातील पहिला विजय नोंदवला अन् पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या. जेमिमाहला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले.
भारताला विजयासाठी शेवटच्या तीन षटकात २८ धावांची गरज होती. मात्र, रिचा आणि जेमिमाह यांच्या मनात काही वेगळेच होते. १८व्या षटकात रिचाने सलग तीन चौकार मारत पहिल्या सामन्याचा मार्गच बदलला. यानंतर तीने १९व्या षटकात पुन्हा तीन चौकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. १९व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर जेमिमाहला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी एका धावेची गरज होती. तीने चौकार मारून आपले अर्धशतकही पूर्ण केले आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला. जेमिमाहच्या टी२० कारकिर्दीतील हे १०वे अर्धशतक होते. जेमिमाहने ५५ चेंडूत ६८ धावा करत नाबाद राहिली आणि रिचाने २५ चेंडूत ४३ धावा केल्या. जेमिमाहने आपल्या डावात सात चौकार मारले, तर रिचाने दोन चौकार आणि दोन षटकार मारले. दोघींमध्ये चौथ्या विकेटसाठी नाबाद ५८ धावांची भागीदारी झाली.
तत्पूर्वी, पाकिस्तानने भारतासमोर १५० धावांचे लक्ष्य ठेवले होते. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानच्या संघाची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच षटकात दीप्ती शर्माने जावेरिया खानला हरमनप्रीत कौरकरवी झेलबाद केले. जवेरियाला सहा चेंडूंत आठ धावा करता आल्या. यानंतर मुनीबा अली आणि कर्णधार बिस्माह मारूफ यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३२ धावांची भागीदारी केली. राधा यादवने ही भागीदारी तोडली. तिने मुनिबाला यष्टिरक्षक रिचा घोषच्या हातून स्टंप आऊट केले. पूजा वस्त्राकरने निदा दारला खातेही उघडू दिले नाही आणि रिचाकडे झेलबाद झाली. सिद्रा अमीन ११ धावा करू शकली आणि राधाकरवी झेलबाद झाली.
यानंतर बिस्माहने आयशासोबत पाचव्या विकेटसाठी ४७ चेंडूत ८१ धावांची नाबाद भागीदारी केली. कर्णधार बिस्माहने ५५ चेंडूत ६८ धावांची नाबाद खेळी खेळली. तीने आपल्या खेळीत सात चौकार मारले. त्याचवेळी आयशाने २५ चेंडूत ४३ धावांची तुफानी खेळी केली. आपल्या खेळीत तीने दोन चौकार आणि दोन षटकार मारले. शेवटच्या पाच षटकात पाकिस्तानने ५८ धावा केल्या आणि एकही विकेट गमावली नाही. अशा प्रकारे २० षटकांनंतर पाकिस्तानने ४ गडी गमावून १४९ धावा केल्या. भारताकडून राधा यादवने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. त्याचवेळी पूजा वस्त्राकर आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
भारतीय महिला संघ आणि पाकिस्तानी महिला संघ यांच्यात आतापर्यंत १३ टी२० सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारतीय महिला संघाने १० वेळा विजय मिळवला आहे, तर पाकिस्तानी महिला संघाने केवळ ३ वेळा विजय मिळवला आहे. दुसरीकडे, जर आपण मागील ५ सामन्यांबद्दल बोललो तर पाकिस्तानी महिला संघ फक्त एकदाच जिंकला आहे, जो त्यांनी २०२२ मध्ये महिला आशिया कपमध्ये विजय मिळवला होता.