नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी सामन्यांची बॉर्डर गावस्कर मालिका सुरु असून पहिला सामना नुकताच भारताने जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. आता मालिकेत दुसरा सामना 17 फेब्रुवारीपासून खेळवला जाणार असून त्यापूर्वी तिसर्या सामन्याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तिसरा कसोटी सामना जो धर्मशाला येथील मैदानात होणार होता तो आता इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
’या’ कारणामुळे सामन्याचं ठिकाण बदललं
बीसीसीआयने सध्या सुरु असलेल्या या बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेतील स्थळ बदलण्याबाबतची माहिती दिली. ज्यामुळे आता हा सामना 1 मार्चपासून इंदूरच्या होळकर स्टेडियमवर होणार आहे. सुरुवातीला धर्मशाला येथील क्रिकेट स्टेडियमवर सामना होणार होता. पण धर्मशाला येथील या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममधील खेळपट्टीच्या समस्यांमुळे सामन्याचं ठिकाण बदलण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.
बीसीसीआयने दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, हिमाचल प्रदेशातील कडाक्याच्या हिवाळ्याच्या परिस्थितीमुळे, आउटफिल्डमध्ये पुरेसं गवत नाही आणि खेळपट्टी खेळण्यायोग्य होण्यासाठी थोडा वेळ लागेल. त्यामुळे हे ठिकाण बदलण्यात येत आहे.