Monday , December 8 2025
Breaking News

कसोटीवर ऑस्ट्रेलियाची पकड, कांगारुंकडे 296 धावांची आघाडी

Spread the love

 

ओव्हल : जागतिक कसोटी विजेतेपदाच्या फायनलवर ऑस्ट्रेलियानं तिसऱ्या दिवशी आपली पकड घट्ट केली आहे. या कसोटीत ऑस्ट्रेलिया तिसऱ्या दिवसअखेर 4 बाद 123 धावांची मजल मारली आहे. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 173 धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळं लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाची एकूण आघाडी 296 धावांची झाली आहे. रविंद्र जाडेजा याने दोन तर उमेश यादव आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मार्नस लाबुशेन 41 तर कॅमरुन ग्रीन 7 धावांवर खेळत होते. त्याआधी या कसोटीत टीम इंडियानं पहिल्या डावात सर्व बाद 296 धावांची मजल मारली. अजिंक्य रहाणे आणि शार्दूल ठाकूर या मुंबईकरांनी झुंजार फलंदाजी करून टीम इंडियाची लाज राखली. त्या दोघांनी सातव्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी रचून भारतीय संघाला फॉलोऑनपासून वाचवलं. अजिंक्य रहाणेनं 129 चेंडूंत 11 चौकार आणि एका षटकारासह 89 धावांची, तर शार्दूल ठाकूरनं 109 चेंडूंत सहा चौकारांसह 51 धावांची खेळी उभारली.

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाला मोहम्मद सिराजने खिंडार पाडले. डेविड वॉर्नर याला अवघ्या एका धावेवर तंबूत पाठवले. त्यानंतर उमेश यादव याने उस्मान ख्वाजा याला 13 धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. 24 धावांवर ऑस्ट्रेलियाचे दोन गडी तंबूत परतले होते. पण त्यानंतर स्मिथ आणि लाबूशेन या जोडीने चिवट फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला. अर्धशतकी भागिदारी करत टीम इंडियाची डोकेदुखी वाढली होती. पण रविंद्र जाडेजा याने स्मिथला 34 धावांवर बाद करत जोडी फोडली. त्यानंतर धोकादायक ट्रेविस हेड 18 धावांवर जाडेजाच्या गोलंदाजीवरच बाद झाला. सध्या मार्नस लाबुशेन आणि कॅमरुन ग्रीन मैदानावर आहेत. ऑस्ट्रेलियाकडे 296 धावांची आघाडी आहे.

रहाणे-लॉर्डमुळे फॉलोऑन वाचला 

अजिंक्य रहाणे आणि लॉर्ड शार्दूल ठाकूर या मुंबईकर खेळाडूंच्या फलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने फॉलोऑन टाळलाय. अजिंक्य रहाणे याने 89 तर शार्दूल ठाकूर याने 51 धावांची खेळी करत भारताचा डाव सावरला. तिसऱ्या दिवशी भारताचा डाव 296 धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्स याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर बोलँड याने केएस भरत याला तंबूत पाठवत भारताच्या अडचणी वाढवल्या. भरत याला फक्त पाच धावांचे योगदान देता आले. भारतीय संघावर फॉलोऑनचं संकट उभे ठाकले होते, त्यावेळी खडूस मुंबईकर धावून आले. अजिंक्य रहाणे आणि शार्दूल ठाकूर या मुंबईकर फलंदाजांनी टीम इंडियाचा डाव सावरला. दोघांनी चौफेर फटकेबाजी करत धावसंख्या वाढवली. पहिल्या सत्रात यांनी नाबाद 100 धावांची भागिदारी केली. पण दुसऱ्या सत्राची सुरुवात झाल्यानंतर रहाणेला बाद करत ऑस्ट्रेलियाने कमबॅक केले.

अजिंक्य रहाणे याने 129 चेंडूत 89 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने एक षटकार आणि 11 चौकार लगावले. तर शार्दूल ठाकूर याने 109 चेंडूत 51 धावांची खेळी केली. यामध्ये सहा चौकारांचा समावेश होता. या जोडीने सातव्या विकेटसाठी 109 धावांची भागिदारी केली. टीम इंडियाकडून ही सर्वात मोठी भागिदारी ठरली. दुसऱ्या दिवशी अजिंक्य रहाणे आणि रविंद्र जाडेजा यांनी 71 धावांची भागिदारी केली होती. आज रहाणे आणि शार्दूल यांनी शतकी भागिदारी करत फॉलोऑन टाळला. अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर भारतीय फलंदाजी कोसळली. शार्दूल ठाकूर याने एकाबाजूने धावा जमवल्या, पण अर्धशतकानंतर तोही बाद झाला. उमेश यादव 5 आणि मोहम्मद शमी 13 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. त्याशिवाय मिचेल स्टार्क, स्कॉट बोलँड आणि कॅमरुन ग्रीन यांनी प्रत्येकी दोन दोन बळी घेतले. नॅथन लायन याने एक विकेट घेतली.

About Belgaum Varta

Check Also

भारताने पाकिस्‍तानला लोळवले : एशिया चषकावर नाव कोरले

Spread the love  दुबई : दुबईमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा आशिया कप २०२५ मधील अंतिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *