नवी दिल्ली : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 209 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर भारतीय संघाला जवळपास महिनाभराचा ब्रेक मिळणार आहे. त्यानंतर जुलै महिन्यात टीम इंडिया वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार असून तेथे उभय संघांमध्ये 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 टी-20 सामन्यांच्या मालिका खेळायच्या आहेत. यादरम्यान, भारतीय संघ आपली बेंच स्ट्रेंथ आजमावू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
रिंकूला मिळू शकते बक्षीस
टी-20 मालिकेसाठी हार्दिक पंड्या टीम इंडियाचे नेतृत्व करण्याची दाट शक्यता आहे. त्याचवेळी आयपीएल 2023 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या यशस्वी जैस्वाल आणि रिंकू सिंग यांची टी-20 संघात निवड होऊ शकते. दोन्ही खेळाडूंनी संपूर्ण हंगामात लक्ष्यवेधून घेतले आणि दबावाच्या परिस्थितीतही त्यांनी संयम गमावला नाही. जैस्वालने राजस्थान रॉयल्ससाठी 14 सामन्यांमध्ये 163.61 च्या स्ट्राइक रेटने 625 धावा फटकावल्या, ज्यात एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. रिंकू या वर्षी कोलकाता नाईट रायडर्ससाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याने 14 सामन्यांत 59.25 च्या सरासरीने 474 धावा केल्या. पंजाबचा यष्टिरक्षक फलंदाज जितेश शर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांनाही टी-20 संघात स्थान मिळू शकते.
कसोटी मालिकेत संधी मिळू शकते
यशस्वी जैस्वाल, मधल्या फळीतील फलंदाज सर्फराज खान आणि वेगवान गोलंदाज मुकेश कुमार यांचा कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात समावेश होऊ शकतो. जैस्वाल आणि मुकेश तर डब्ल्यूटीसी फायनलसाठी स्टँडबाय खेळाडू म्हणून लंडनला गेले होते. सरफराजचा प्रथम श्रेणीतील रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 79.65 च्या सरासरीने 3505 धावा केल्या आहेत. यासह विकेटकीपर म्हणून इशान किशन, केएस भरतकडे लक्ष वेधण्याची शक्यता आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्यावर टीम इंडियाचे वेळापत्रक
पहिला कसोटी सामना – 12 ते 16 जुलै, डॉमिनिका
दुसरा कसोटी सामना – 20 ते 24 जुलै, पोर्ट ऑफ स्पेन
पहिला वनडे सामना – 27 जुलै, ब्रिजटाऊन
दुसरा वनडे सामना – 29 जुलै, ब्रिजटाऊन
तिसरा वनडे सामना – 15 ऑगस्ट, पोर्ट ऑफ स्पेन
पहिला टी-20 सामना – 3 ऑगस्ट, पोर्ट ऑफ स्पेन
दुसरा टी-20 सामना – 6 ऑगस्ट, गयाना
तिसरा टी-20 सामना – 8 ऑगस्ट, गयाना
चौथा टी-20 सामना – 12 ऑगस्ट, फ्लोरिडा
पाचवा टी-20 सामना – 13 ऑगस्ट, फ्लोरिडा
Belgaum Varta Belgaum Varta