नवी दिल्ली : क्रिकेट जगतातील सर्व क्रिकेटप्रेमी वाट पाहणारा सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान. आता या सामन्याचा आनंद पुन्हा एकदा क्रिकेटप्रेमींना अनुभवता येणार आहे. कारण आगामी आशिया कप 2023 स्पर्धेत दोन्ही संघ एकाच गटात असणार आहेत. नुकतीच आशिया कप संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. आज आशियन क्रिकेट काऊन्सिलने आशिया चषकाची घोषणा केली. 31 ऑगस्ट 2023 ते 17 सप्टेंबर 2023 यादरम्यान आशिया चषक रंगणार आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्थान आणि नेपाळ या देशांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. 13 एकदिवसीय सामन्यानंतर आशियाचा किंग कोण? यावरुन पडदा उठणार आहे.
भारत-पाकिस्तान तीन वेळा आमनेसामने
आशिया चषकामध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान एकाच गटामध्ये आहेत. अ गटामध्ये भारत, पाकिस्तान आणि नेपाळ संघ आहे. तर ब गटामध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका असे तीन संघ आहेत. आशिया चषकामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तीन सामने रंगण्याची शक्यता आहे. साखळी फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होईल. त्यानंतर सुपर – 4 मध्ये पुन्हा एकदा आमनेसामने येतील… जर सुपर 4 मध्ये दोन्ही संघाने गुणतालिकेत आघाडीवर स्थान पटकावले तर आशिया चषकाची फायनल भारत आणि पाकिस्तान यांच्यात होण्याची शक्यता आहे.
यंदा आशिया कप एकदिवसीय स्वरुपात
यावेळची आशिया कप स्पर्धा सप्टेंबरमध्ये होणार असून एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. यावेळी आशिया कप स्पर्धेच्या एका गटात भारत, पाकिस्तानसह नेपाळ हा संघ असेल. तर श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान दुसऱ्या गटात आहेत. यामध्ये एकूण 13 सामने खेळवले जाणार आहेत. आशिया कपमध्ये 6 सुपर 4 सामने होणार आहेत.
आशिया चषकासाठी हायब्रिड मॉडेल
आशिया चषकासाठी हायब्रिड मॉडेल वापरण्यात आलेय. पाकिस्तानमध्ये चार सामने होणार आहेत. तर उर्वरित सर्व सामने श्रीलंकामध्ये खेळवण्यात येणार आहेत. हायब्रिड मॉडेलचा स्विकार केल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये जाणार नाही? हे आता जवळपास स्पष्ट झालेय. टीम इंडियाचे सर्व सामने श्रीलंकामध्ये खेळवण्यात येणार आहेत. लवकर आशिया चषकाच्या वेळापत्रकाची घोषणा होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरारक सामना श्रीलंकामध्ये होण्याची शक्यता आहे.