नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात 209 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. आता पुढील डब्ल्यूटीसीच्या मोहिमेची सुरुवात ॲशेस मालिकेने होणार असून टीम इंडियाही वेस्ट इंडिज दौऱ्याने नव्याने सुरुवात कराण्यास सज्ज झाली आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 टी-20 सामन्यांच्या मालिका खेळणार आहे. दरम्यान, टी-20 संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्याकडे जाईल अशी जोरदार चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत या दौऱ्यावर काही युवा खेळाडू पुन्हा एकदा मैदानात उतरताना दिसतील.
टीम इंडियाला नवे सलामीवीर मिळणार
विंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या टी-20 संघात चार सलामीवीरांचा समावेश केला जाऊ शकतो. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड आणि इशान किशन यांना या दौऱ्यात संधी दिली जाऊ शकते. यापैकी कोणतेही दोन खेळाडू टीम इंडियासाठी डावाची सुरुवात करताना दिसू शकतात.
मधली फळीही मजबूत
कॅरेबियन मैदानावर खेळणासाठी निवड समिती भारतीय संघाची मधली फळीही मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा आणि नेहल वढेरा यांची देखील अंतिम 16 मध्ये निवड केली होऊ शकते. त्याचबरोबर या खेळाडूंना कर्णधार हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांची साथ मिळेल. रवींद्र जडेजाला विश्रांती दिली जाते की त्याचा समावेश होणार हे पाहणे विशेष ठरणार आहे. गोलंदाजी आक्रमणासाठी वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, आकाश मधवाल यांच्यासह फिरकीपटू रवी बिश्नोई आणि युझवेंद्र चहल यांचा संघात समावेश केला जाऊ शकतो. आयपीएलमध्ये या खेळाडूंची कामगिरी लक्षवेधी ठरली आहे.
संभाव्य भारतीय टी-20 संघ
शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, टिळक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, जितेश शर्मा, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, आकाश मधवाल.