पोर्ट ऑफ स्पेन येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताने 438 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरदाखल वेस्ट इंडिजनेही दमदार सुरुवात केली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजने एक बाद 86 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेट याने दमदार फलंदाजी केली. भारताकडे अद्याप 352 धावांची आघाडी आहे. दुसरा दिवस भारताकडून विराट कोहली, रविंद्र जाडेजा आणि अश्विन यांनी गाजवला. विराट कोहलीने दमदार शतक झळकावले. तर अश्विन आणि जाडेजा यांनी अर्धशतके ठोकली.
वेस्ट इंडिजचे सलामी फलंदाज क्रेग ब्रेथवेट आणि टी चंद्रपॉल यांनी संयमी आणि अश्वासक सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७१ धावांची भागिदारी केली. रविंद्र जाडेजा याने चंद्रपॉल याला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेट 37 खेळत होता. या खेळीत त्याने तीन चौकार लगावले. तर चंद्रपॉल याने चार चौकाराच्या मदतीने 33 धावांचे योगदान दिले. 14 धावांवर नाबाद आहे, त्याने या छोटेखानी खेळीमध्ये एक चौकार आणि एक षटकार लगावला.
दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 438 धावांपर्यंत मजल मारली. विराट कोहलीने आपल्या 500 वे आंतरराष्ट्रीय सामन्यात शतकाला गवसणी घातली. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात हा 100 वा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताकडून विराट कोहलीने दमदार शतक झळकावले. त्याशिवाय कर्णधार रोहित शर्मा, सलामी फलंदाज यशस्वी जयस्वाल, अष्टपैलू रविंद्र जाडेजा आणि आर. अश्विन यांनी अर्धशतके ठोकली. दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर विराट कोहली आणि रविंद्र जाडेजा यांनी संयमी फलंदाजी केली. खेळपट्टीवर जम बसल्यानंतर दोघांनीही धावा काढण्यास सुरुवात केली. विराट कोहलीने पहिल्यांदा शतक झळकावले, त्यानंतर रविंद्र जाडेजाने अर्धशतक ठोकले. पण त्यानंतर लागोपाठ भारताच्या विकेट पडल्या. विराट कोहलीने 121 धावांची खेळी केली. तर रविंद्र जाडेजाने 61 धावांचे योगदान दिले.
विराट कोहलीने 206 चेंडूत 121 धावांची दमदार खेळी केली. या खेळीत त्याने 11 चौकार लगावले. तर रविंद्र जाडेजा याने 152 चेंडूत पाच चौकाराच्या मदतीने 61 धावांची खेळी केली. विराट कोहली आणि रविंद्र जाडेजा यांनी पाचव्या विकेटसाठी दीडशतकी भागिदारी केली. रविंद्र जाडेजा आणि गिल झटपट बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि रविंद्र जाडेजा यांनी डावाला आकार दिला.
रविंद्र जाडेजा आणि विराट कोहली एकापाठोपाठ एक बाद झाले. त्यानंतर इशान किशन आणि आर. अश्विन यांनी धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. पण इशान किशन 25 धावा काढून बाद झाला. इशान किशन याने चार चौकाराच्या मदतीने 37 चेंडूत 25 धावांची खेळी केली.
इशान किशन बाद झाल्यानंतर उनाडकटही फार काळ टिकला नाही. उनाडकट सात धावा काढून तंबूत परतला. मोहम्मद सिरजला खातेही उघडता आले नाही. अश्विन याने तळाच्या फलंदाजांना हाताशी धरत भारताची धावसंख्या वाढवली. अश्विन याने अखेरीस फटकेबाजी करत अर्धशतक पूर्ण केले. अश्विन याने 78 चेंडूत आठ चौकाराच्या मदतीने 58 धावांची खेळी केली. वेस्ट इंडिजकडून केमर रोज आणि जोमल वॉरिकन यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. तर जेसन होल्डर याने दोन फलंदाजांना तंबूत पाठवले.