अटीतटीच्या लढतीत वेस्ट इंडिजने भारताचा दोन विकेटने पराभव केला. भारातने दिलेले 153 धावांचे आव्हान विडिंजने दोन आठ विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. विडिंजकडून निकोलस पूरन याने 67 धावांची दमदार खेळी केली. या विजयासह विडिंजने मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे.
भारताने दिलेल्या 153 धावांच्या आव्हानाचा पाठलाग कताना विडिंजच्या फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली. एकापाठोपाठ एक विकेट जात असतानाही धावगती कायम ठेवण्यात विडिंज फलंदाज यशस्वी झाले. विडिंजने सहा षटकात 61 धावा केल्या होत्या. पण यादरम्यान त्यांना तीन विकेट गमावाव्या लागल्या होत्या. ब्रेंडन किंग याला खातेही उघडता आले नाही. ब्रेंडन किंग याला हार्दिक पांड्याने शुन्यावर बाद केले. जॉनसन चार्ल्स यालाही मोठी खेळी करता आली नाही. तो 2 धावांवर बाद झाला. काइल मायर्स 15 धावा काढून बाद झाला. एकीकडे विकेट पडत असताना निकोलस पूरन याने दमदार फलंदाजी केली.
निकोलस पूरन याने विडिंजच्या डावाला आकार दिला. निकोलस पूरन याने 40 चेंडूत 67 धावांची खेली केली. या खेळीत पूरन याने चार षटकार आणि सहा चौकार लगावले. निकोलस पूरन याला कर्णदार रोमन पॉवले याने चांगली साथ दिली. त्याशिवाय शिमरन हेटमायर यानेही महत्वाची खेळी केली. हेटमायर याने 22 चेंडूत एक चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 22 धावांची खेळी केली. कर कर्णधार रोवमन पॉवेल याने 19 चेंडूत एक षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 21 धावा केल्या.
विडिंज जिंकणार असे वाटत असतानाच चहल याने फेकलेले षटकामुळे सामन्यात रंगत वाढली. चहल याने एकाच षटकात दोन फलंदाजांना तंबूत पाठवले. त्याशिवाय शेफर्ड धावबाद झाला. त्यामुळे सामान रंगतदार अवस्थेत पोहचला होता. शेफर्ड आणि जेसन होल्डर यांना खातेही उघडता आले नाही.
अकिल हुसेन आणि अल्झारी जोसेफ या जोडीने तळाला दमदार फलंदाजी करत विडिंजला विजय मिळवून दिला. अकिल हुसेन याने 16 तर अल्झारी जोसेफ याने 10 धावांची खेळी केली. दरम्यान, भारताकडून हार्दिक पांड्या याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर युजवेंद्र चहल याने दोन फलंदाजांना तंबूत धाडले. त्याशिवाय अर्शदीप आणि मुकेश कुमार यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.
संजू-गिल अन् सूर्या फ्लॉप, युवा तिलक वर्माचे वादळी अर्धशतक
तिलक वर्माच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतीय संघाने निर्धारित 20 षटकांत 152 धावांपर्यंत मजल मारली. तिलक वर्माने 51 धावांची खेळी केली. तिलक वर्माचा अपवाद वगळता इतर एकाही फलंदाला 30 धावसंख्या ओलांडता आली नाही. वविडिंजकडून अल्झारी जोसेफ आणि अकिल हुसेन यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या.
तिलक वर्माचा झंझावात
पहिल्या टी20 सामन्यात वादळी फलंदाजी करणाऱ्या तिलक वर्माने दुसऱ्या टी20 सामन्यात झंझावाती फलंदाजी केली. तिलक वर्माने अर्धशतकी खेळी करत भारताचा डाव सावरला. त्याने 41 चेंडूत 51 धावांची खेळी केली. आपल्या दुसऱ्याच सामन्यात तिलक वर्माने अर्धशतक ठोकलेय. तिलक वर्मा याने आपल्या अर्धशतकी खेळीमध्ये पाच चौकार आणि दोन षटकार ठोकले. तिलक वर्माने ईशान किशन याच्यासोबत 36 चेंडूत 42 तर हार्दिक पांड्यासोबत 27 चेंडूत 38 धावांची भागिदारी करत भारताच्या डावाला आकार दिला.
हार्दिक -ईशानची सुरुवात चांगली पण…
ईशान किशन याला चांगली सुरुवात मिळाली पण तो मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. ईशान किशन याने 27 धावांची छोटेखानी खेळी केली. ईशान किशन याने या खेळीमध्ये दोन षटकार आणि दोन चौकार लगावले. ईशान किशन प्रमाणे हार्दिक पांड्यालाही सुरुवात मिळाली पण मोठी धावसंख्या उभारता आली नाही. हार्दिक पांड्याने मोक्याच्या क्षणी विकेट फेकली. हार्दिक पांड्याने 18 चेंडूत दोन चौकारांसह 24 धावांची खेळी केली. हाणामारीच्या षटकात पांड्या बाद झाल्यामुळे भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. हार्दिक पांड्यानंतर अक्षर पटेल यानेही विकेट फेकली. अक्षर पटेल याला फक्त 14 धावा करता आल्या. रवि बिश्नोई आणि अर्शदीप सिंह यांनी अखेरच्या षटकात चौकार षटकार लगावल्यामुळे भारताची धावसंख्या 152 पर्यंत पोहचली.
संजू-गिल अन् सूर्या फ्लॉपच
प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. सलामी फलंदाज शुभमन गिल याने पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी केली. गिल अवघ्या सात धावा काढून तंबूत परतला. अल्झारी जोसेफ याने गिल याचा अडथळा दूर झाला. दुसऱ्या क्रमांकावर आलेला सूर्यकुमार एका धावेवर धावबाद झाला अन् भारताची फलंदाजी अडचणीत आली. संजू सॅमसन यालाही संधीचे सोनं करता आले नाही. संजू सॅमसन अवघ्या सात धावा काढून बाद झाला. संजू, शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांना पहिल्या टी20 सामन्यातही लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नव्हती.
वेस्ट इंडिजचा भेदक मारा
वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी पहिल्या षटकांपासूनच भेदक मारा केला. त्यांनी भारतीय फलंदाजांना स्थिरावू दिले नाही. तिलक वर्माचा अपवाद वगळता एकाही भारतीय फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. वेस्ट इंडिजकडून अल्झारी जोसेफ, शेफर्ड आणि अकिल हुसेन यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या.