चेन्नई : भारतीय हॉकी संघाने विश्वचषकावर नाव कोरलं आहे. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने मलेशियाचा 4-3 असा पराभव केला आहे. चेन्नईच्या महापौर राधाकृष्णन हॉकी स्टेडियमवर हा अंतिम फेरीचा थरारक सामना पार पडला. भारताने अवघ्या 11 मिनिटांत सामन्याला रंजक वळणे देत मलेशियाचा 4-3 असा पराभव करत चौथ्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं आहे. या विजयानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा
हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने हा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने सुरुवातीच्या हाफमध्ये 1-3 ने पिछाडीवर असताना मलेशियाचा 4-3 असा पराभव केला. चेन्नईमध्ये शनिवारी संध्याकाळी महापौर राधाकृष्णन स्टेडियमवर झालेल्या रंजक सामन्यात भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं.
भारत विरुद्ध मलेशिया सामना अत्यंत चुरशीचा
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या भारत विरुद्ध मलेशिया अंतिम सामना अत्यंत चुरशीचा झाला. मलेशियासाठी अबू कमाल अझराई, रझी रहीम आणि मुहम्मद अमिनुद्दीन यांनी गोल करून भारतासाठी सलामीवीर जुगराज सिंहने केलेल्या गोलमुळे भारतीय संघाची चांगली सुरुवात झाली. भारताकडून तिसर्या क्वार्टरमधील शानदार प्रदर्शनामुळे हरमनप्रीत सिंह आणि गुरजंत सिंह यांनी प्रत्येकी एक-एक गोल करून मलेशियासोबत बरोबरी केली. त्यानंतर अंतिम क्वार्टरमध्ये आकाशदीप सिंहने विजयी गोल करून भारताला चौथ्यांदा आशियाई चॅम्पियन्स स्पर्धेचं विजेतेपद मिळवून दिलं.
अखेरच्या मिनिटात सामना फिरवला
भारतीय संघाला सामन्यात गोल करण्याची अनेकदा संधी मिळाली पण सुरुवातीला संधीचं सोनं भारतीय संघाला करता आले नाही. मलेशियाने 28 व्या मिनिटाला गोल करत आघाडी घेतली. मलेशियासाठी मोहम्मद अमिनुद्दीन याने पेनल्टी कॉर्नरवर जबरदस्त गोल केला. मलेशियाच्या आक्रमणापुढे भारतीय संघ 3-1 ने पिछाडीवर पडला होता. भारतीय संघ चषक गमावणार अशीच स्थिती निर्माण झाली होती. पण भारताने तिसऱ्या हापमध्ये दमदार कमबॅक केलेय. भारतीय संघ 3-2 ने पिछाडीवर होता पण अखेरच्या काही मिनिटांत भारतीय खेळाडूंनी आपला खेळ उंचावला. अखेरच्या दोन मिनिटांत भारतीय संघाने दोन गोल करत सामना -4-3 अश फरकाने खिशात घातला.