सिडनी : क्रीडा जगतासाठी आज सकाळी सकाळी एक वाईट बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा मृत्यू झाला आहे. अँड्र्यू सायमंड्सचा शनिवारी रात्री टाऊन्सविले येथे कार अपघातामध्ये मृत्यू झाला. सायमंड्सला वाचवण्याचे खूप प्रयत्न करण्यात आले, मात्र सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. अँड्र्यू सायमंड्स यांच्या निधनानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. याआधी काही महिन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचेही निधन झाले होते.
अँड्र्यू सायमंड्सचा हर्वे रेंजमध्ये रात्री 10:30 वाजता अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच तात्काळ पोलिस घटनास्थळी पोचले. एलिस नदीच्या पुलाजवळ हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी पोहोचलेल्या रुग्णवाहिकेतून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. या अपघातात सायमंड्स गाडीत एकटाच होता. त्याला गंभीर दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सर्व प्रयत्न करूनही अँड्र्यूला वाचवता आले नाही.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट जगतासाठी हे वर्ष अत्यंत दुःखद ठरले आहे. त्याच वर्षी ऑस्ट्रेलियन खेळाडू रॉड मार्श आणि शेन वॉर्न यांचाही मृत्यू झाला. आता अँड्र्यूच्या मृत्यूनंतर चाहत्यांची ह्रदये तुटली आहेत. 46 वर्षीय अँड्र्यू सायमंड्सच्या मृत्यूनंतर त्याच्या चाहत्यांची निराशा झाली आहे. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक ऍडम गिलख्रिस्टने ट्विटद्वारे आपले दुःख व्यक्त केले आहे. अँड्र्यूने ऑस्ट्रेलियासाठी 26 कसोटी, 198 वनडे आणि 12 टी-20 सामने खेळले आहेत. यासोबतच 2003 आणि 2007 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक विजयातही त्याचा मोलाचा वाटा आहे.
Belgaum Varta Belgaum Varta