
बीजिंग : चीनमधील हंगझोऊ येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या टेनिस मिश्र दुहेरीत आज भारतीय जोडी रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले यांनी इतिहास रचला. त्यांनी चिनी तैपेईची जोडी त्सुंग-हाओ हुआंग आणि एन-शूओ लियांग यांना ट्रायब्रेकरमध्ये २-६, ६-३,१०-४ अशा सेटमध्ये हरवत सुवर्णपदक जिंकले.
पहिला सेट हरल्यानंतर रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले यांनी जोरदार कमबॅक केले. त्यानंतर ट्रायब्रेकरमध्ये त्यांनी चिनी तैपेईच्या जोडीवर मात केली.
जकार्ता २०१८ मध्ये पुरुष दुहेरीत सुवर्ण जिंकल्यानंतर बोपन्नाचे आशियाई स्पर्धेतील हे दुसरे सुवर्णपदक आहे. रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले यांना पहिल्या फेरीत बाय मिळाल्यानंतर दुसऱ्या फेरीत उझबेकिस्तानच्या अकगुल अमानमुराडोवा-मॅक्सिम शिन यांचा ६-४, ६-२ असा पराभव केला होता.
भारतीय टेनिस जोडीने राउंड १६ च्या फेरीत अयानो शिमिझू-शिंजी हाजावा या जोडीचा ६-३, ६-४ असा पराभव केला होता. तर उपांत्यपूर्व फेरीत कझाकच्या झिबेक कुलंबायेवा-ग्रिगोरी लोमाकिन जोडीचा ७-५, ६-३ असा पराभव केला.
रोहन बोपण्णा-ऋतुजा भोसले आणि चायनीज तैपेईच्या हाओ-चिंग चॅन आणि यू-ह्सिओ हसू यांच्यात झालेला सामना टायब्रेकरमध्ये गेला होता. पण चुरशीच्या या सामन्यात ६-१, ३-६, १०-४ अशा सेटमध्ये सामना जिंकत बोपण्णा-रुतुजा यांनी अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीत त्यांचा सामना चिनी तैपेईची आणखी एक जोडी नवव्या मानांकित त्सुंग-हाओ हुआंग आणि एन-शूओ लियांग यांच्याशी झाला.
आशियाई क्रीडा स्पर्धेतील रोहन बोपण्णाची ही दुसरी टेनिस फायनल होती. या भारतीय टेनिस दिग्गज खेळाडूने जकार्ता २०२८ मध्ये पुरुष दुहेरीत सुवर्णपदक जिंकले होते.
Belgaum Varta Belgaum Varta