
अहमदाबाद : आयसीसी वन डे विश्वचषकाच्या महायुद्धाला आजपासून अहमदाबादच्या रणांगणात सुरुवात होत आहे. गतविजेत्या इंग्लंड आणि गतवेळच्या उपविजेत्या न्यूझीलंड संघांमधल्या लढाईनं या महायुद्धाची ठिणगी पडणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर सलामीचा सामना होणार आहे. दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. विश्वचषकाच्या या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन पहिल्या सामन्याला उपलब्ध नसेल. तर इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सही या सामन्यात खेळणार नाही. दुखापतीमुळे दोन्ही संघाचे आघाडीचे खेळाडू पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नाहीत. याचा फटका दोन्ही संघाला बसू शकतो. 2019 च्या वर्ल्डकप फायनलमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना बरोबरीत सुटला होता. त्यानंतर चौकार जास्त असणाऱ्या इंगलंडला विजयी घोषीत केले होते. त्यामुळे या पराभवाचा वचपा काढण्यासाठी किवी मैदानात उतरतील.
नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी कशी आहे ?
जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर एकूण 11 खेळपट्टया आहेत. लाल आणि काळ्या मातीने ही खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. काही खेळपट्टीवर धावा जास्त होतात. सलामीच्या सामन्यात जी खेळपट्टी वापरण्यात येईल, त्यावर जास्त धावा निघतील. इंग्लंडकडे विस्फोटक फंलदाज आहेत, न्यूझीलंडही कमी नाही. त्यामुळे सामना रंगतदार होईल.
वरचढ कोण?
गेल्या महिन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये चार सामन्याची वनडे मालिका पार पडली होती. न्यूझीलंड संघाने पहिला सामना जिंकला होता. पण त्यानंतर इंग्लंडच्या संघाने वादळी कामगिरी केली. दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने 79, तिसऱ्या सामन्यात 181, चौथ्या सामन्यात 100 धावांनी जिंकला होता. अखेरच्या दोन्ही सामन्यात इंग्लंडने 300 पेक्षा जास्त धावा केल्या. वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यातही 300 पेक्षा जास्त धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दोन्ही संघाचे शिलेदार
न्यूझीलंड : केन विलियमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चैपमैन, डेवोन कॉनवे, लॉकी फर्ग्यूसन, मैट हेनरी, टॉम लॅथम, डेरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिच सेंटनर, ईश सोधी, टिम साउदी, विल यंग
इंग्लंड: जोस बटलर (कर्णधार), मोइन अली, गस एटकिंसन, जॉनी बेयरस्टो, सैम कुरेन, लियाम लिविंगस्टोन, डेविड मालन, आदिल राशिद, जो रूट, हैरी ब्रूक, बेन स्टोक्स, रीस टॉपले, डेविड विली, मार्क वुड, क्रिस वोक्स
Belgaum Varta Belgaum Varta