
पॅरिस ऑलिम्पिकचे तिकिट सुद्धा फायनल
भारतीय हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पुरुष हॉकी फायनलमध्ये जपानचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले आहे. भारताने विजेतेपदाच्या लढतीत जपानचा 5-1 असा पराभव केला. भारताने नऊ वर्षांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. याआधी भारताने इंचॉन येथे 2014 मध्ये पुरुष हॉकीमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचे हे चौथे (1966, 1998, 2014 आणि 2023) सुवर्णपदक आहे. तर नऊ रौप्य (1958, 1962, 1970, 1974, 1978, 1982, 1990, 1994, 2002) आणि तीन कांस्यपदक (1986, 2010, 2018) जिंकले आहेत. शानदार फॉर्मात असलेल्या टीम इंडियाने पुढील वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीटही बुक केले आहे. भारतासाठी कर्णधार हरमनप्रीत सिंग 2 तर मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, अभिषेक यांनी गोल करून विजयावर शिक्कामोर्तब केला. जपानसाठी सेरेन तनाका याने एकमेव गोल केला.
पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. भारताला काही पेनल्टी कॉर्नरही मिळाले, मात्र गोल करण्यात अपयश आले. दुसऱ्या क्वार्टरच्या 25व्या मिनिटाला भारताने पहिला गोल केला. मनप्रीत सिंगने रिव्हर्स हिटवर गोल करत भारतीय संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. हाफ टाइमपर्यंत भारताने ही आघाडी कायम ठेवली.
तिसऱ्या क्वार्टरच्या 32व्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर ड्रॅग फ्लिकसह उत्कृष्ट गोल केला. यासह भारताची आघाडी 2-0 अशी झाली. यानंतर 36व्या मिनिटाला अमित रोहिदासने पेनल्टी कॉर्नरवर ड्रॅग फ्लिकसह उत्कृष्ट गोल करत भारताची आघाडी 3-0 ने वाढवली.
यानंतर चौथ्या क्वार्टरमध्येही भारताने दोन गोल केले. 48व्या मिनिटाला अभिषेकने अप्रतिम मैदानी गोल केला. मात्र, सेरेन तनाकाने 51व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत स्कोअर 4-1 असा केला. त्यानंतर हरमनप्रीतने सामना संपायला एक मिनिट शिल्लक असताना 59व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर उत्कृष्ट गोल करत भारताला 5-1 असा शानदार विजय मिळवून दिला.
Belgaum Varta Belgaum Varta