हैदराबाद : एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेतील दुसरा सामना हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तान आणि नेदरलँडसचे संघ आमनेसामने आले होते. दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँड्सचा ८१ धावांनी पराभव केला. नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ ४९ षटकांत २८६ धावांत गारद झाला. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ ४१ षटकांत २०५ धावांवर सर्वबाद झाला. पाकिस्तानकडून अर्धशतक झळकावणाऱ्या सौद शकीलची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.
बास डी लीडे आणि विक्रमजीतचे अर्धशतक ठरले व्यर्थ
नेदरलँडसाठी फक्त पाच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. बास डी लीडेने सर्वाधिक ६७ धावा केल्या. त्याने ६८ चेंडूंच्या खेळीत सहा चौकार आणि दोन षटकार मारले. सलामीवीर विक्रमजीत सिंगने ६७ चेंडूत ५२ धावा केल्या. लोगान व्हॅन बीकने २८ चेंडूत २८ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. कॉलिन अकरमनने १७ आणि साकिब झुल्फिकारने १० धावा केल्या. पाकिस्तानकडून हरिस रौफने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. हसन अलीला दोन विकेट्स मिळाल्या. शाहीन आफ्रिदी, इफ्तिखार अहमद, शादाब खान आणि मोहम्मद नवाज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवान आणि सौद शकील झळकावली अर्धशतकं
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांनी ६८-६८ धावा केल्या. मोहम्मद नवाजने ३९ आणि शादाब खानने ३२ धावांचे योगदान दिले. हारिस रौफने १६, इमाम उल हकने १५, शाहीन आफ्रिदीने नाबाद १३ आणि फखर जमानने १२ धावा केल्या. इफ्तिखार अहमदला केवळ नऊ धावा तर बाबर आझमला केवळ पाच धावा करता आल्या. हसन अलीला खातेही उघडता आले नाही. नेदरलँड्सकडून बास डी लीडेने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. कॉलिन अकरमनला दोन विकेट्स घेता आल्या. आर्यन दत्त, लोगन व्हॅन बीक आणि पॉल व्हॅन मीकरेन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.