Friday , November 22 2024
Breaking News

विराट-राहुलची जिगरबाज खेळी! भारताचा ऑस्ट्रेलियावर 6 गड्यांनी विजय

Spread the love

 

चेन्नई : विराट कोहली (115 चेंडूत 85) आणि केएल राहुल (115 चेंडूत नाबाद 97) यांच्या झुंझार खेळीच्या जोरावर भारताने विश्वचषकातील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला. भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. कांगारूंच्या 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इशान किशन, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतले. अवघ्या दोन धावांत भारताने तीन विकेट गमावल्या होत्या. पण कोहली-राहुल जोडीने जिगरबाज खेळी करून भारताला विश्वचषकातील पहिल्या सामन्यात विजय मिळवून दिला. या दोघांनी 215 चेंडूत विक्रमी 165 धावांची भागिदारी रचली.

ऑस्ट्रेलियाचे भारतापुढे 200 धावांचे आव्हान होते. हे आव्हान माफक वाटत होते. पण हे आव्हान थिटे दिसत असले तरी भारताला सुरुवातीपासूनच एकामागून एक धक्के बसायला लागले. भारताला पहिल्याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर पहिला धक्का बसला. इशान किशन गोल्डन डक वर बाद झाला. त्याचा स्टार्कने माघारी पाठवले. यानंतर पुढच्याच दुस-या षटकात हेजलवूडने भारताला एकामागून एक दोन झटके दिले. त्याने तिस-या चेंडूवर रोहित शर्मा आणि त्यानंतर सहाव्या चेंडूवर श्रेयस अय्यर यांना बाद करून भारताचे कंबरडे मोडले. भारताच्या या दोन्ही फलंदाजांना खाते उघडता आले नाही. भारताची 3 बाद 2 अशी दयनीय अवस्था होती. संघ अडचणीत सापडला होता. एकामागून एक धक्के बसत असताना भारत हा सामना गमावेल, अशी धाकधून लागून राहिली. पण संघासाठी विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी संकटमोचकाची भूमिका साकारली आणि अत्यंत जबाबदारीने खेळ केला. विराटने 116 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 85 तर लोकेश राहुलने 115 चेंडूत 2 षटकार आणि आठ चौकारांच्या जोरावर 97 धावांची दणदणीत खेळी साकारली. कोहली बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्याला मैदानात उतरला. त्याने 11 धावा केल्या आणि भारताच्या विजयाला हातभार लावला. ऑस्ट्रेलियातर्फे जोश हेझलवूडने तीन आणि मिचेल स्टार्कने एक विकेट घेतली.

विराटचा झेल सोडणे ऑस्ट्रेलियाला पडले महागात
12 धावांच्या स्कोअरवर विराट कोहलीला जीवदान मिळाले. जोश हेजलवूडच्या चेंडूवर कोहलीने पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू हवेत गेला. मिचेल मार्श झेल घ्यायला धावला, पण चेंडू त्याच्या हातात आलाच नाही.

विराट-केएलने मोदला एबी-स्मिथचा विक्रम
विराट कोहलीने 114 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 85 धावा केल्या आणि केएल राहुल सोबत चौथ्या विकेटसाठी 165 धावांची उत्कृष्ट भागीदारी केली. या भागीदारीच्या जोरावर या दोन्ही फलंदाजांनी द. आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्स आणि ग्रॅमी स्मिथ यांचा विक्रम मोडीत काढला. या दोन फलंदाजांनी 2007 मध्ये कांगारू संघाविरुद्ध एकदिवसीय विश्वचषकात 160 धावांची भागीदारी केली होती, मात्र आता हे दोघेही तिसऱ्या क्रमांकावर घसरले असून कोहली आणि राहुल दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत.

ऑस्ट्रेलियन संघ 199 धावांवर ऑलआऊट
ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात खराब झाली. मिचेल मार्श खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिम्थने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, मात्र या दोन्ही खेळाडूंना मोठी खेळी करता आली नाही. वॉर्नर 41 धावा करून बाद झाला तर स्मिथ 46 धावा करून बाद झाला. मार्नस लॅबुशेनने 27 धावांचे योगदान दिले. शेवटी मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सने काही मोठे फटके मारले. स्टार्कने 15 आणि कमिन्सने 28 धावा केल्या. पण त्यांचा संपूर्ण संघ 49.3 षटकांत 199 धावांत ऑलआऊट झाला. त्यामुळे भारताला विजयासाठी 200 धावांचे लक्ष्य मिळाले

About Belgaum Varta

Check Also

आयसीसीच्या अध्यक्षपदी जय शाह यांची बिनविरोध निवड

Spread the love  नवी दिल्ली : बीसीसीआय सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *